दिशा लाईव्ह न्यूज -:-- पहूर (ता. जामनेर) येथील सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज गुरुवारी (दि. १० जुलै) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पहूर येथे घडली.
मृत तरुणाचे नाव ऋषिकेश समाधान खाटीक (वय १९) असे असून तो आपल्या आजोबांसोबत राहून शिक्षण घेत होता. सैन्यात भरती होण्याचे त्याचे स्वप्न होते आणि त्यासाठी तो झपाटून मेहनत करत होता.
गुरुवारी सायंकाळी आजोबा पांडुरंग गोविंदा खाटीक यांच्या शेतात फवारणीसाठी हौद भरताना ऋषिकेशचा तोल जाऊन डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे तो बेशुद्ध अवस्थेत विहिरीत पडला आणि बुडून गेला. घरच्यांनी शोधाशोध केली असता विहिरीजवळ सायकल व चपला दिसल्या त्यानंतर विहिरीत पाहणी केली असता ऋषिकेशचा मृतदेह पाण्यात आढळून आला.
त्याला तात्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ . भूषण पाटील यांनी त्यास तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
दुर्दैवी ऋषिकेशचे मातृछत्र हरपले होते. वडिलांनी दुसरा विवाह केल्यामुळे तो आजोबांच्या छायेखालीच वाढला. फर्दापूर येथे त्याने उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. सैन्यात सहभागी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणारा ऋषिकेश आज काळाच्या पडद्याआड गेला.
त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अंतिम संस्कार उद्या (११ जुलै) सकाळी ११ वा . करण्यात येणार आहेत.
Post a Comment
0 Comments