दिशा लाईव्ह न्यूज---:::---- महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी राज्यातील कंपन्यांचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) फंड शेतरस्त्यांसाठी सक्तीचा करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी डॉ. पी. अन्बलगन (उद्योग सचिव, महाराष्ट्र राज्य) यांना निवेदन दिले.
श्री. पवळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,
स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रलंबित असलेला शेतरस्त्यांचा प्रश्न आजही कायम आहे. रस्त्याअभावी शेतकऱ्यांचे शेतीपूरक व्यवसाय बंद पडणे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, शेतमाल बाजारात न पोहोचणे, जमिनी पडीक पडणे, अगदी फौजदारी स्वरूपाच्या घटना घडणे अशा गंभीर परिणामांना शेतकरी तोंड देत आहेत.
शेतरस्त्यांच्या सीमांकन व मोजणीसह हद्द निश्चिती सरकारने सुरू केली आहे, परंतु आता या रस्त्यांचे तातडीने मजबुतीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी कंपन्यांचा सीएसआर फंड सक्तीने वळवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
शरद पवळे यांचे म्हणणे:
“भारत कृषीप्रधान देश आहे. औद्योगिकीकरणासाठी शेतकऱ्यांनी आपली जमीन दिली आणि राज्यात कंपन्यांचा विकास झाला, ही आनंदाची बाब आहे. पण शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शेतरस्ते तितकेच आवश्यक आहेत. अतिवृष्टीमुळे कच्चे रस्ते वाहून जातात आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. जर कंपन्यांचा सीएसआर निधी शेतरस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी वापरला, तर ग्रामविकासाला मोठी चालना मिळेल आणि ‘समृद्ध शेतकरी – समृद्ध महाराष्ट्र’ हे स्वप्न पूर्ण होईल.”

Post a Comment
0 Comments