पहूर प्रतिनिधी-- (ता. जामनेर)
दिशा लाईव्ह न्यूज ----जळगाव – छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफवरील पहूर येथे शाळेजवळ गतिरोधक, सिग्नल यंत्रणा, झेब्रा क्रॉसिंग आणि सूचनाफलक लावावेत अशी मागणी डॉ. हेडगेवार प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय देशमुख व शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष शंकर भामेरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दररोज सुमारे ८०० विद्यार्थी जीव मुठीत धरून शाळेत ये-जा करतात. भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
यापूर्वीही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देऊन येथे सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी करण्यात आली होती. ग्रामसभेत तसेच शिक्षक-पालक संघाच्या बैठकीतही एकमुखी ठराव करण्यात आला; मात्र अद्यापपर्यंत गतिरोधक, सिग्नल यंत्रणा व सूचनाफलक बसविण्यात आलेले नाहीत.
पाळधी अपघातानंतरही प्रशासन जागे होणार का ?
पाळधी येथे झालेल्या भीषण अपघातात एका निरपराध व्यक्तीचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले होते. संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले.
मग पहूरमध्येही दुर्घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का ? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
पहूर येथे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शाळेजवळ कोणतीही सुरक्षा व्यवस्था न केल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. तात्काळ आवश्यक उपाययोजना न झाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष शंकर भामेरे यांनी दिला आहे.
यावेळी शिक्षक किरण पाटील यांची उपस्थिती होती .



Post a Comment
0 Comments