Type Here to Get Search Results !

घरी वडिलांचे निधन… तरीही जड अंतःकरणाने आशिकेतने दिला दहावीचा पहिला पेपर आईच्या शब्दाला मान देत वडिलांच्या स्वप्नासाठी विद्यार्थ्याची जिद्द


पहूर प्रतिनिधी--- ता. जामनेर.

दिशा लाईव्ह न्यूज. --::----दहावीचा पहिलाच मराठीचा पेपर… आणि केंद्रावर पोहोचताच वडिलांच्या निधनाची दुर्दैवी बातमी… कोणाचाही धीर सुटेल असा क्षण. पण अशा अत्यंत वेदनादायी प्रसंगातही पिंपळगाव कमानी येथील विद्यार्थी आशिकेत रशीद तडवी याने मनाला दगड करून आधी पेपर देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या धैर्याने सर्वांचे डोळे पाणावले.


पहूर येथील आर. टी. लेले हायस्कूल परीक्षा केंद्रावर आशिकेत मराठीचा पेपर देण्यासाठी आला होता. त्याचवेळी वर्गशिक्षक आर. डी. सुरवाडकर यांना गावातून फोन आला आणि वडील रशीद सचंदर तडवी यांच्या निधनाची बातमी समजली. ही वार्ता ऐकताच आशिकेतला हुंदका अनावर झाला; मात्र आईने धीर देत सांगितले — “आधी पेपर दे… हेच तुझ्या वडिलांना खरे समाधान मिळेल.”



आईच्या शब्दाला मान देत त्याने जड अंतःकरणाने परीक्षा हॉलमध्ये प्रवेश केला. डोळ्यांत अश्रू… मनात दुःख… तरीही त्याने पूर्ण वेळ बसून पेपर लिहिला. बाहेर पडताना उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतही पाणी होते.


आज सकाळी सुमारे नऊ वाजेच्या सुमारास त्यांचे वडील रशीद सचंदर तडवी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. तरीही आपल्या शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर खचून न जाता आशिकेतने जबाबदारीची जाणीव दाखवली.


दहावीचे वर्ष आयुष्याला कलाटणी देणारे मानले जाते. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिलेला हा पहिला पेपर म्हणजेच त्याने वडिलांना वाहिलेली खरी श्रद्धांजली असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


या प्रसंगाने उपस्थित प्रत्येकाला एकच संदेश दिला —

परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, कर्तव्य आणि आई-वडिलांच्या स्वप्नांपुढे दुःखही थांबते.

Post a Comment

0 Comments