Type Here to Get Search Results !

“आईच्या कुशीत वाढलेला मुलगा… अखेर त्याच हातांनी माऊलीला जाळलं!” लग्न जुळवून न दिल्याच्या संशयातून धुळ्यात थरारक प्रकार; महिंदळे गाव हादरलं




दिशा लाईव्ह न्यूज--::---धुळे तालुक्यातील महिंदळे गावात घडलेल्या एका अमानुष घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. ज्या आईने नऊ महिने पोटात वाढवलं, संकटांशी झुंज देत लेकराला मोठं केलं, त्याच मुलाने रागाच्या भरात जन्मदात्या आईलाच जिवंत पेटवून दिल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. 

मृत महिलेचं नाव जिजाबाई भटू खैरनार-पाटील (वय ६५) असं असून, आरोपी मुलगा प्रदीप उर्फ दगडू खैरनार-पाटील (वय ४५) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रदीप हा रिक्षाचालक असून त्याचं लग्न होत नसल्यामुळे तो कायम आईवर संताप व्यक्त करत होता. “आई मुद्दाम माझं लग्न होऊ देत नाही,” असा संशय त्याच्या मनात घर करून बसला होता. 

शुक्रवारी मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत घरी परतलेल्या प्रदीपने आईशी पुन्हा वाद घातला. “माझं लग्न का लावत नाही?” असा जाब विचारत त्याने संतापाच्या भरात आईच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून तिला पेटवून दिलं. जिजाबाई यांच्या आक्रोशाने परिसर दणाणून गेला. मदतीला धावलेल्या नागरिकांनाही आरोपीने धमकावल्याची माहिती समोर आली आहे. 

गंभीर भाजलेल्या जिजाबाई यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला “आई स्वतः भाजली” असा बनाव करण्याचा प्रयत्न आरोपीने केला; पण पोलिसांच्या चौकशीत सत्य बाहेर आलं. 

या घटनेनंतर महिंदळे गावात संतापाची लाट उसळली आहे. गावकऱ्यांच्या मते, जिजाबाई शांत आणि साध्या स्वभावाच्या होत्या. “ज्या आईने आयुष्यभर लेकरासाठी झिजलं, तिच्याच जीवावर मुलगा उठला,” अशी हळहळ ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. 

दारूचं व्यसन, मानसिक असंतुलन आणि कौटुंबिक तणाव किती भयानक टोक गाठू शकतो, याचं हे विदारक उदाहरण मानलं जात आहे. आई-मुलाच्या पवित्र नात्यालाच काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झालं आहे. 


Post a Comment

0 Comments