Type Here to Get Search Results !

पावसावरच जगणाऱ्या कुऱ्हाड-–लोहारा पट्ट्याला पाण्याचा आधार कधी? कुऱ्हाड–लोहारा परिसरात सिंचन प्रकल्पांची मागणी!! अनेक वर्षांपासून फ़क्त आश्वासन.



दिशा लाईव्ह न्यूज-:- सुनील लोहार. (ता. पाचोरा) : पाचोरा व जामनेर तालुक्यातील कुऱ्हाड–लोहारा परिसर हा कायम अवर्षणग्रस्त पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागात पाण्याच्या शाश्वत स्रोतांचा अभाव असल्याने येथील शेतकरी केवळ पावसावरच शेती अवलंबून ठेवतात. परिणामी, चार महिन्यांच्या पावसाळ्यानंतर उर्वरित काळात शेती पूर्णतः कोरडी पडते आणि शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते.

या परिसरात मोठे कालवे, नद्या किंवा स्थिर सिंचन व्यवस्था नसल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे शासनाने जलसंधारण व सिंचन प्रकल्पांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी स्थानिक शेतकरी गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने करत आहेत.

जलाशय अपुरे आणि क्षमतेत मर्यादा.


परिसरात उपलब्ध असलेले लहान-मोठे जलाशय अपुरे असून त्यांची पाणी साठवण क्षमता अत्यंत कमी आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर काही महिन्यांतच हे जलाशय कोरडे पडतात. मोठ्या जलस्रोतांचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना केवळ विहिरी किंवा मर्यादित पाण्यावर शेती करावी लागते.



धरणांच्या खोलीकरणाची गरज.


स्थानिक धरणांची उंची वाढवून व खोलीकरण करून पाणीसाठा वाढविणे आवश्यक असल्याचे शेतकरी सांगतात. सध्या विहिरींच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने रब्बी व उन्हाळी हंगामात पाण्याची तीव्र टंचाई भासते. परिणामी पिकांचे मोठे नुकसान होते.

तापी– गिरणा-पूर्णा नदीचे पाणी या  परिसरात वळविण्याची मागणी

या भागातील शेतकरी तापी व गिरणा, पूर्णा या नद्यांमधील अतिरिक्त पाणी वळवून या पट्ट्यात आणण्याची मागणी अनेक वर्षांपासून करत आहेत. या प्रकल्पामुळे दुष्काळग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळू शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

स्थानिक शेतकरी नेते व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, या भागाचा समावेश कायम अवर्षणग्रस्त क्षेत्रात होत असल्याने शासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. तापी– गिरणा-पूर्णा नदीचे पाणी वळविण्याचा प्रकल्प मार्गी लागल्यास शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणावर सुटू शकतो.अशी शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी.


जलसंधारण प्रकल्पांना गती द्यावी

धरणांचे खोलीकरण व क्षमता वाढवावी.


तापी– गिरणा -पूर्णा नदीचे पाणी या भागात वळवावे

सिंचनासाठी कायमस्वरूपी योजना राबवावी

या सर्व मागण्यांमुळे कुऱ्हाड–लोहारा परिसरातील शेतकऱ्यांना शाश्वत पाण्याचा आधार मिळेल आणि शेती उत्पादन वाढीस लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


आमचा परिसर कायम अवर्षणग्रस्त पट्ट्यात येत असल्याने मी तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची भेट घेऊन तापी व पूर्णा नदीचे पावसाळ्याच्या दिवसात वाया जाणारे पाणी या परिसरात वळवल्यास हा परिसर कायम सुजलाम सुफलाम होईल. म्हणून तरी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्याने भागपुर उपसा सिंचन प्रकल्पास शासनातर्फे मान्यता मिळून हे काम सुरू झालेले आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी या पाण्याचा नक्कीच उपयोग होईल.


श्री.अरुण पाटील, मा. शेतकरी सेना जिल्हा प्रमुख,कुऱ्हाड.



Post a Comment

0 Comments