Type Here to Get Search Results !

नांद्रा (प्र. लो.) येथे वसुबारसेनिमित्त गोपूजन उत्साहात; सहाव्या वर्षीही परंपरेचा उत्साह कायम

 


दिशा लाईव्ह न्यूज  :- : भारतीय संस्कृतीत गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व असून, तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे वसुबारस. याच धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करत दि. ५ नोव्हेंबर रोजी वसुबारसेनिमित्त नांद्रा(प्र. लो.) येथील श्रीराम मंदिरात गोपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम मंदिरासमोर श्री. बळीराम दादा पाटील यांची गाय व वासरू आणून करण्यात आली. यावेळी पाच जोडप्यांच्या हस्ते विधिवत गोमातेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गाय व वासराला घास भरवून गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी गावातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच बालगोपालांनीही गोपूजन करून गोमातेचे दर्शन घेतले. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

हा कार्यक्रम ऋषी आत्मारामानंदजी महाराज, वृंदावन यांच्या आशीर्वादाने तसेच ग्रामविकासच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना युवा कीर्तनकार ह.भ.प. अविनाश महाराज नाचणखेडा यांनी गोमातेचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व विशद केले. भारतीय संस्कृतीत गाय ही केवळ पशुधन नसून ती श्रद्धा, सेवा, संवर्धन आणि समृद्धीचे प्रतीक आहे. गोमातेचे रक्षण, संगोपन आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.



कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना हरीष पाटील यांनी नांद्रा गावातील या उपक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. ग्रामविकासच्या माध्यमातून गावात गेल्या पाच वर्षांपासून वसुबारसेनिमित्त गोपूजनाची परंपरा सुरू असून, यंदा या उपक्रमाचे सहावे वर्ष असल्याचे त्यांनी सांगितले. ऋषी आत्मारामानंदजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि ग्रामविकासच्या सहकार्याने दरवर्षी हा उपक्रम अधिक उत्साहाने राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील नागरिकांना एकत्र आणणे, नव्या पिढीला भारतीय संस्कृती व परंपरांची ओळख करून देणे आणि गोसेवेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. अशा उपक्रमांमुळे गावातील सामाजिक एकोपा, धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा अधिक दृढ होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


या कार्यक्रमास ह.भ.प. अविनाश महाराज, पवन महाराज यांच्यासह ग्रामस्थ, महिला, पुरुष आणि बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामविकास टीम, नांद्रा यांच्या सदस्यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच श्री. दिवाकर पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पाटील, अविनाश वाघ आणि प्रमोद पाटील यांनी परिश्रम घेतले.

शेवटी ग्रामविकास टीम, नांद्रा यांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवर, ग्रामस्थ आणि सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले. भक्तिभाव, उत्साह आणि सामाजिक एकोप्याच्या वातावरणात हा गोपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला. सहा वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही परंपरा यापुढेही अशीच कायम राहावी, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.




Post a Comment

0 Comments