दिशा लाईव्ह न्यूज -:-- :- येथील बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवणाऱ्या व्यक्तींवर कारवाई होण्याबाबतचे निवेदन एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्था लोहाराच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले व कारवाई न झाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा दिला.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार दिव्यांगत्वाचे २१ प्रकार आहेत.जळगांव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सदस्य समिती दिव्यांगत्वाचे प्रमाण ठरवुन तसेच प्रमाणपत्र दिले जाते.
मात्र लोहारा ता पाचोरा येथील काही नवीन व्यक्तींना कुठल्याही प्रकारचे अपंगत्व नसतांना ऑनलाईन फॉर्म सबमिट करून काही दलालांना हाताशी धरून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढीत आहेत व यापुर्वीही काही व्यक्तींनी काढलेले आहे.त्यानुसार ४० % पासुनच्या पुढील दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळणाऱ्या व्यक्तींना शासनाचे लाभ घेता येतात.परंतु पुढे सदर प्रमाण पत्रांची शहानिशा होत नाही.
तसेच खरोखर जी व्यक्ती दिव्यांग आहे, त्यांची तपासणी होवुनही ४० % च्या पुढे टक्केवारी न देता त्यांची प्रमाणपत्र रिजेक्ट होतात किंवा २० ते ३० % टक्केवारी टाकुन प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे खरोखर दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना पुन्हा पुन्हा हेलपाटे मारावे लागतात व कुठलंही दिव्यांगत्व नसलेल्या व्यक्तींना त्वरीत दिव्यांग प्रमाणपत्र व युडीआयडी कार्ड दिल्याचे आढळते.सदरची बाब ही चिंताजनक असल्याने बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवणारे व्यक्तींचा शोध घेणे आवश्यक झालेले आहे. याबाबतचा दि.११/३/२०२४ रोजी अर्ज देऊनही आज तागायत कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.
सबब दि.०१/०४/२०२३ रोजी पासून दिव्यांग प्रमाणपत्र व युडीआयडी कार्ड जारी झालेल्या सर्वांची नव्याने तपासणी होवुन कागदपत्रांची योग्य ती पडताळणी होवुन त्यांचेवर तात्काळ कायदेशिर कारवाई व्हावी व बनावट व्यक्तींना दिलेले प्रमाणपत्र व युडीआयडी कार्ड त्वरीत रद्द करण्यात यावे. अन्यथा लोहारा ता पाचोरा येथील सर्व दिव्यांग बांधव-भगिनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास बसणार आहेत.
सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगांव, अध्यक्ष दिव्यांग मंडळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगांव, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग जळगांव, सचीव दिव्यांग कल्याण विभाग मुंबई, आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांना देण्यात आलेल्या आहेत.
एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष श्री.सुरेश पाटील, सचिव श्री.विजय जाधव, खजिनदार श्री.कांतीलाल राजपुत, सदस्य श्री.विकास शिवदे-भोई, बाळू जाधव, अनिल चौधरी, अनिल राजपूत, अहमद खान व इतर दिव्यांग हजर होते.
Post a Comment
0 Comments