जामनेर -:-- जामनेर शहरातील सोनबर्डी परिसरात असलेल्या जलतरण तलावात बुडून पंधरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी ४ ते ५ वाजेच्या सुमारास घडली. मृत मुलाचे नाव संकेत निवृत्ती पाटील (वय १५, मूळ राहणार घोसला, ता. सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, सध्या हिवारखेडा रोड, जामनेर) असे आहे.संकेत हा आपल्या मित्रांसोबत सोनबर्डीच्या पायथ्याशी असलेल्या जलतरण
तलावाजवळ फिरण्यासाठी गेला होता. फिरत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडाला. काही क्षणांतच तो दिसेनासा झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने जामनेर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.आरोग्यदूत जालम सिंग राजपूत आणि एका तरुणाने संकेतला वाचवण्यासाठी जलतरण तलावात उडी घेतली. त्याचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, काही वेळाने त्याचा मृतदेह सापडला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर जामनेर पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार आणि नगर परिषद मुख्याधिकारी नितीन बागुल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली आणि पुढील तपास सुरू केला.
संकेत हा जामनेर येथे शिक्षणासाठी आला होता. तो ८वीत शिकत होता आणि कुटुंबासह हिवारखेडा रोड येथे राहत होता.सदर जलतरण तलाव गेल्या दोन वर्षांपासून बंद होता. अलीकडेच हा तलाव सुरू करण्याच्या तयारीसाठी पाणी भरण्यात आले होते. मात्र, उद्घाटनाआधीच ही दुर्दैवी घटना घडली.
संकेतचा मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृतदेह पाहताच नातेवाईकांनी आक्रोश केला, आणि घटनास्थळी शोककळा पसरली.जामनेर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून जलतरण तलावांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Post a Comment
0 Comments