Type Here to Get Search Results !

दुभाजकावर धडकून कारने घेतला पेट गर्भवती पत्नीचा जळून मृत्यू ; पती जखमी अर्ध्यावरती डाव मोडला . . . अधुरी एक कहाणी पहूर - वाकोद मार्गावर घडली दुर्घटना



पहूर प्रतिनिधी-- ता जामनेर

 दिशा लाईव्ह न्यूज --::--- रस्ता दुभाजकावर  धडकलेल्या कारने क्षणात पेट घेतला आणि भडकलेल्या ज्वाळांमध्ये गर्भवती मातेचा दुर्दैवी जळून मृत्यू झाला तर  कारचालक पती जखमी झाल्याची दुर्घटना जळगाव - छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग ७५३ एफ वर पहूर वाकोद दरम्यान दुपारी अडीच वाजेच्या  सुमारास घडली .

       याबाबत अधिक माहिती अशी की ,  संग्राम मोरे ( रा . पूलमखेडा , ता . जि . बुलढाणा ) हे भुसावळ तालुक्यातील  सासूरवाडीहून  छत्रपती संभाजीनगरकडे पहूरमार्गे पत्नी जान्हवी संग्राम मोरे यांच्यासह मारुती ग्रँड व्हिटारा कारने जात होते . दुपारी अडीच  वाजेच्या सुमारास त्यांची कार वाकोद नजीक येताच समोरच्या डिव्हाइडरवर धडकली . 



कार डिव्हायडर वर धडकताच मोठा आवाज झाला आणि क्षणात गाडीने पेट घेतला . काही कळायच्या आतच कारमधून प्रचंड ज्वाला आणि धुराचे लोट बाहेर पडू लागले . अशाच अवस्थेत वाहनचालक संग्राम मोरे बाहेर पडले मात्र कार मध्ये असलेल्या त्यांच्या पत्नी जान्हवी संग्राम मोरे ( वय २१ वर्षे  )  या मात्र  आगीच्या ज्वाळांनी होरपळून जागीच मृत्युमुखी पडल्या . 



 घटना घडतात महामार्गावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश पाटील , परेश महाजन यांच्यासह स्थानिक नागरिक व ये -जा करणाऱ्या प्रवाशांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला . 

    घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कोठारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली .

जखमी अवस्थेत असलेले संग्राम मोरे यांना तात्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले . डॉ .राहुल निकम ,डॉ . जितेंद्र राजपूत ऋषिकेश भालेराव व सहकार्यांनी प्रथमोपचार केले .

पुढील उपचारासाठी संग्राम पाटील यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे .  मयत जान्हवी मोरे यांचे शवविच्छेदन पहूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले .


 दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ . राहुल निकम यांच्या खबरीवरून पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .  पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कोठारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे .


              अग्निशमन दलाचे प्रयत्न -

शेंदुर्णी नगर परिषदेच्या अग्निशमन दलास घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते . वाकोद येथील रहिवाशांनी देखील टँकरद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला .

           उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट -

दरम्यान पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहाम यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली .

      अर्ध्यावरती डाव मोडला . . . अधुरी एक कहाणी


मार्च महिन्यात जान्हवी आणि संग्राम यांचा विवाह झाला होता . सुखी संसाराचे स्वप्न रंगवत लवकरच आपण आई होणार असल्याची चाहूल जान्हवी यांना लागली होती .  मात्र दुर्दैवाने सहा महिन्यांचे बाळ उदरात असताना  कारमध्येच अग्निज्वाळांच्या भडक्यामुळे  जान्हवी मोरे यांची प्राणज्योत मालवली .

             कारमध्ये सीएनजी गॅस ?

 नेमका स्पोट कशामुळे झाला ? याबाबत घटनास्थळी वेगवेगळे तर्क लावले जात होते . कार सीएनजी गॅस इंधनावर  होती की पेट्रोलवर याविषयी आरटीओ इन्स्पेक्शन मधून माहिती समोर येणार आहे .

तथापि या घटनेमुळे पहूर आणि वाकोद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

Post a Comment

0 Comments