कृष्णा पाटील-तोरणाळा/ फत्तेपुर
दिशा लाईव्ह न्यूज --:::---जामनेर तालुक्यातील फत्तेपूर परिसरात शेतकऱ्यांना लक्ष्य करून होणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत असताना, फत्तेपूर जवळील तोरणाळे गावात शेतकऱ्याच्या घरातून तूर चोरी झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तोरणाळे येथील शेतकरी विष्णू धुमसिंग पाटील हे तोरणाळे येथे वास्तव्यास असून शेती हाच त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. त्यांच्या नावावर अनाड ता. सोयगाव जि. संभाजीनगर येथील शिवारात गट क्रमांक 20 मध्ये सुमारे 4 एकर शेती आहे. सदर शेतात त्यांनी यंदा कपाशी व तूर पिकाची लागवड केली होती. हंगाम संपल्यानंतर काढणी केलेली तूर सुरक्षिततेसाठी तोरणाळे येथील त्यांच्या राहत्या घराच्या पोर्चमध्ये साठवून ठेवण्यात आली होती.
दिनांक 02 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 09:30 वाजता कुटुंबीय जेवण करून घरात झोपण्यासाठी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी संधी साधत घराच्या पोर्चमध्ये ठेवलेली तूर चोरून नेली. सकाळी दिनांक 03 फेब्रुवारी 2026 रोजी सुमारे 06:30 वाजता उठल्यानंतर पोर्च रिकामा दिसताच चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या चोरीच्या घटनेत एकूण 12 कट्टे तूर चोरीस गेली असून प्रत्येक कट्ट्याचे वजन सुमारे 70 किलो असल्याने एकूण 8 क्विंटल 40 किलो तूर अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. चोरीस गेलेल्या तुरीची अंदाजे बाजारभावानुसार किंमत 58 हजार 800 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्याच्या कष्टातून मिळालेला माल चोरीस गेल्याने पाटील कुटुंबावर मोठा आर्थिक आघात झाला आहे.
या प्रकरणी शेतकरी विष्णू धुमसिंग पाटील यांनी फत्तेपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून दिनांक 03/02/2026 रोजी रात्री 01:51 वाजता अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) 2023 मधील कलम 303(3) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद राठोड व पोलीस अमलदार प्रवीण चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयित हालचाली तसेच स्थानिक माहितीच्या आधारे पुढील तपास सुरू असून लवकरच चोरट्यांचा शोध घेण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
या घटनेमुळे तोरणाळे व फत्तेपूर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, रात्रीच्या वेळी घराबाहेर ठेवलेल्या शेतमालाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




Post a Comment
0 Comments