Type Here to Get Search Results !

सोयगाव तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे व मदतीची मागणी




दत्तात्रय काटोले, सोयगाव

दिशा लाईव्ह न्यूज--::-: तालुक्यात काल दुपारी तसेच रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वीज पडून पशुधनाचाही फटका बसला असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, सोयगावच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करून तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई काळे यांच्या हस्ते हे निवेदन देण्यात आले.



तालुक्यातील विविध भागांत झालेल्या गारपीट व पावसामुळे काढणीस आलेली ज्वारी, गहू, हरभरा, मका तसेच कांदा बियाणे ही पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत. फळबागांसह नागवेली पानमळे आणि मोसंबी बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. टरबूज, खरबूज, भाजीपाला व कांदा या पिकांना सर्वाधिक फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

नुकसानीचे स्वरूप गंभीर असल्याने प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी तसेच दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, हवामान विभागाने २० व २१ मार्चदरम्यान विदर्भ व मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांना वेळेवर सूचना देऊन जागृती करावी आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी तेजस्विनी ताई काळे (जिल्हा चिटणीस), सुनील गावंडे (तालुका उपाध्यक्ष), वसंत राठोड (खरेदी-विक्री संघ संचालक), मयूर मनगटे, धनराज राठोड, संजय आगे, संजय चौधरी, विजय गव्हाड, प्रा. गणेश मिसाळ आदी उपस्थित होते.

सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे.

Post a Comment

0 Comments