दिशा लाईव्ह न्यूज-:- दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावावर अत्यंत मोठी शोककळा पसरली आहे. शुक्रवारी (३ एप्रिल) रात्री एका खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून परतताना मारुती सुझुकी एमपीव्ही कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक भीषण अपघात घडला. शिवाजीनगर परिसरातील राजे बँक्वेट हॉल व मंगल कार्यालयाजवळील शेतातील एका विहिरीत कार कोसळून सहा विद्यार्थ्यांसह नऊ जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. या घटनेत दरगोडे कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला असून, गावामध्ये एकाच वेळी नऊ जणांवर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या अपघातामध्ये शेतकरी सुनील दत्तू दरगोडे, त्यांची पत्नी रेश्मा आणि मोठी मुलगी गुणवंती यांनी जीव गमावला. त्यांच्या पश्चात केवळ साडेतीन वर्षांचा लहान मुलगा राहिला आहे. याच घटनेत त्यांच्या दोन पुतण्यांचाही मृत्यू झाला. दुसऱ्या बाजूला, अनिल मनोहर दरगोडे यांना स्वतःच्या डोळ्यांसमोर कुटुंबाला गमावताना पाहावे लागले. त्यांनी आपली पत्नी आशा, मुलगी सृष्टी, मुलगा श्रेयस आणि पुतणी समृद्धी यांना कारमध्ये बसवले आणि स्वतः दुचाकीने निघाले होते. त्यांच्या डोळ्यांदेखतच कार विहिरीत कोसळली. सुदैवाने, श्रुती सुनील उमरे आणि नरेंद्र सुनील उमरे या भावंडांनी कारऐवजी वडिलांच्या दुचाकीवरून जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांचे प्राण थोडक्यात बचावले.
शनिवारी (४ एप्रिल) सकाळी अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे, माजी आमदार रामदास चारोस्कर, धनराज महाले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, प्रांताधिकारी आप्पासाहेब शिंदे आणि तहसीलदार मुकेश कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व रुग्णालयात जाऊन नातेवाइकांचे सांत्वन केले.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, विहीरमालक राजेंद्र राजे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धोकादायक विहीर तातडीने बुजविण्याचे आणि जिल्ह्यातील अशा विहिरींचे सर्वेक्षण करून उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांकडे सोपवण्यात आले असून, दिंडोरी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


Post a Comment
0 Comments