दिशा लाईव्ह न्यूज --::-- भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झळाळते नेतृत्व आणि साहित्याच्या प्रांगणातील शब्दप्रभू म्हणून ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे आचार्य अण्णासाहेब दिनकरराव शामराव शेळके. लोहारा मातीचा हा सुपुत्र म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हती, तर ते एक चालते-बोलते विद्यापीठ होते. त्यांच्या कार्याचा आवाका आणि विचारांची खोली मोजणे कठीण आहे.
आचार्य आण्णासो आणि माझी घट्ट मैत्री.ते आमच्या वडिलांच्या वयाचे. मात्र मी कितीतरी पटीने लहान असूनही त्यांची आणि माझी विचारांची देवाण-घेवाण रोज व्हायची.
आज आण्णासो आपल्यात नाहीत, मात्र त्यांनी खोलवर रुजवलेली विचारांची बीजे आजही ताजीतवानी आहेत. आण्णासो यांच्या समरणार्थ मी माझ्या न्यूज चॅनेलचे नाव दिशा (दिनकरराव शामराव ) ठेवले आहे..त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर चालण्याचा मी प्रयत्न करतोय.
अण्णांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे वर्णन करताना या ओळी चपखल बसतात:
"शब्दांत ज्यांच्या धार होती, अन् मनात माणुसकीची ओल,
त्याग अन् विद्वत्तेचा, अण्णांच्या जगण्यात अनमोल मोल."
वक्रांतीचा सूर्य आणि शब्दांची मांदियाळी
अण्णासाहेबांचा जीवनप्रवास हा संघर्षातून तावून-सुलाखून निघालेला सुवर्णप्रवास होता. देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. १९५७-५८ चा संयुक्त महाराष्ट्र लढा असो, गोवामुक्ती संग्राम असो की हैदराबाद मुक्ती संग्राम; अण्णांनी प्रत्येक रणधुमाळीत सक्रिय सहभाग नोंदवला. प्रबोधनकार ठाकरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि थोर समाजवादी नेते एस.एम. जोशी यांसारख्या दिग्गजांशी त्यांचे असलेले स्नेहाचे संबंध त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतात.
तथापि, या लढवय्या नेत्यामध्ये एक हळवा कवी आणि द्रष्टा लेखकही दडला होता. त्यांची लेखणी शस्त्रासारखी अन्याय मोडीत काढणारी होती, तर साहित्यात ती मोगऱ्याच्या फुलासारखा सुगंध दरवळणारी होती. त्यांच्या साहित्याबद्दल असे म्हणता येईल:
"अक्षरे ही शस्त्रे झाली, जेव्हा गरज होती क्रांतीची,
अन् शब्द झाले चांदणे, जेव्हा वाट पाहिली शांततेची."
'स्थितप्रज्ञ' ऋषी आणि साधेपणाचे लेणे
अण्णासाहेबांचा व्यासंग दांडगा होता. इतिहास, समाजशास्त्र आणि संस्कृतीच्या अथांग डोहात ते लीलया संचार करत. तरीही, "विद्यया विनयेन शोभते" या उक्तीचा ते चालता-बोलता पुरावा होते. ज्यांच्याकडे अफाट ज्ञान आणि कर्तृत्व होते, त्यांना अहंकाराचा स्पर्शही झाला नाही. एखाद्या वटवृक्षाने झुकून सावली द्यावी, तसे ते सामान्य माणसांत मिसळायचे.
भूमिहीनांच्या हक्कासाठी त्यांनी दिलेला लढा म्हणजे केवळ समाजसेवा नव्हती, तर ती एक कर्तव्यभावना होती. त्यांच्या मनातील करुणेचे दर्शन त्यांच्या प्रत्येक कृतीतून घडायचे.
जीवनामृताचा अक्षय झरा
लोहारे येथील पाण्याचे टाकी खाली किंवा हायस्कूल जवळील पीर बाबांच्या कट्ट्यावर अण्णा बसले की तिथे विचारांची मैफल जमायची. त्यांच्याशी झालेला संवाद म्हणजे वैचारिक घुसळण असायची. निराशेच्या अंधारात चाचपडणाऱ्या तरुणांसाठी ते दीपस्तंभ होते. त्यांच्या संवादातून 'जीवनामृत' पाझरायचे, जे मनातील थकवा दूर करून जगण्याची नवी उभारी द्यायचे.
अशा या महान व्यक्तिमत्वाच्या निधनाने एक संपन्न युग संपले असले, तरी त्यांनी पेरलेले विचार आजही अंकुरत आहेत. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना मन म्हणते:
"देहाने गेले तरी, विचारांनी ते सदैव सोबत आहेत,
लोहारा गावच्या मातीतील सुगंधात, अण्णा आजही जिवंत आहेत."
आचार्य अण्णासाहेब शेळके हे केवळ एका गावाचे किंवा तालुक्याचे नव्हते, तर ते महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेचे एक भूषण होते. साधेपणा, विद्वत्ता आणि समाजहित यांचा त्रिवेणी संगम असलेल्या या महान 'ऋषी'ला कोटी-कोटी प्रणाम!

Post a Comment
0 Comments