दिशा लाईव्ह न्यूज--::--:: शासनाकडून 'एक पेड माँ के नाम' सारख्या मोहिमा राबवून वृक्षारोपणाचा संदेश दिला जात असतानाच, जळगाव जिल्ह्यातील बांबरूड राणी परिसरात मात्र याच्या उलट चित्र पाहायला मिळत आहे. या भागातील जुन्या आणि डेरेदार वृक्षांची बेसुमार कत्तल केली जात असल्याने पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. या प्रकारामुळे स्थानिक वृक्षप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
नेमका प्रकार काय?
बांबरूड राणी परिसरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात आहे. विशेष म्हणजे, लाकूड माफियांनी आता वृक्षतोडीसाठी 'नवीन फंडा' शोधला आहे. यात झाड एकदम न तोडता आधी त्याच्या मोठ्या फांद्या कापल्या जातात आणि झाड बोडखे केले जाते. त्यानंतर काही महिन्यांनी मुख्य बुंधा कापून झाड पूर्णपणे नष्ट केले जाते. यामुळे ही वृक्षतोड नैसर्गिक वाटावी असा त्यांचा प्रयत्न असतो.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?
अवैध वृक्षतोड उघडपणे सुरू असतानाही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. "संबंधित विभागाचा आशीर्वाद असल्याशिवाय लाकूड पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाडस वाढू शकत नाही," अशी भावना स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत असताना, अशा प्रकारे होत असलेली कत्तल निसर्गासाठी घातक ठरत आहे.
शेतकऱ्याचा आक्रमक पवित्रा!!
या संदर्भात एका स्थानिक शेतकऱ्याने प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत. त्यांच्या मते, केवळ कागदावर योजना आखून वृक्ष संवर्धन होणार नाही. जर शासनाला खरोखरच झाडे जगवायची असतील, तर खालील कडक पावले उचलली पाहिजेत:
- शासकीय कर्मचाऱ्यांना सक्ती: प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने किमान दोन झाडे लावून ती जगवून दाखवल्याशिवाय त्यांना पगार देऊ नये.
- योजनांचा लाभ: कर्ज किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ देताना 'झाडे लावा व जगवा' ही अट बंधनकारक करावी.
मागणी.....
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि पावसाचे प्रमाण टिकवण्यासाठी वृक्षतोड तातडीने थांबवणे आवश्यक आहे. संबंधित विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि वृक्ष संवर्धनासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी बांबरूड राणी परिसरातील वृक्षप्रेमींनी केली आहे.

.jpg)
Post a Comment
0 Comments