दिशा लाईव्ह न्यूज-:--तारखेडा (ता. पाचोरा) : ग्रामीण आरोग्य सेवेला बळकटी देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत, तारखेडा येथील आरोग्य उपकेंद्रात पूर्णवेळ कर्मचारी नियुक्त करण्याचे आश्वासन आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहे. शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
तारखेडा परिसरात गेल्या काही काळापासून आरोग्य उपकेंद्रात पूर्णवेळ कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत किंवा रात्रीच्या वेळी वैद्यकीय मदत मिळण्यात उशीर होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेतला.
याबाबत त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश सोनवणे यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. सध्या शेतीचे हंगामाचे दिवस सुरू असल्यामुळे बहुतांश नागरिक दिवसभर शेतात कार्यरत असतात. त्यामुळे रात्री किंवा पहाटे अचानक आजारपण, अपघात किंवा अन्य वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ उपचार मिळणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
या मागणीची तात्काळ दखल घेत डॉ. सोनवणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तारखेडा उपकेंद्राची पाहणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार लोहटार प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरोग्य विभागाची विशेष टीम तारखेडा येथे पाठवण्यात आली. या पथकात सौ. वैष्णवी राजपूत (कुष्ठरोग समन्वयक), श्री. सी. डी. पाटील (आरोग्य सहाय्यक), श्री. दीपक दीक्षित (आरोग्य सहाय्यक) आणि श्री. जितू पाटील (आरोग्य सेवक) यांचा समावेश होता.
पथकाने उपकेंद्राची प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध सुविधा, औषधसाठा, उपकरणे आणि मनुष्यबळ यांचा आढावा घेतला. तसेच स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचारी उपलब्ध नसल्याची समस्या विशेषतः मांडली.
पाहणीनंतर पथकाने सकारात्मक प्रतिसाद देत “दोन ते तीन तारखेपासून उपकेंद्रात पूर्णवेळ कर्मचारी उपलब्ध करून दिले जातील. तसेच कोणत्याही अत्यावश्यक परिस्थितीत २४ तास सेवा देण्यासाठी संपर्क व्यवस्था कार्यान्वित केली जाईल,” असे आश्वासन दिले.
या निर्णयामुळे तारखेडा आणि परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा अधिक सक्षम आणि तत्पर करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः शेतकरी व मजूर वर्गासाठी हा दिलासा देणारा ठरला आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनीही राजेंद्र पाटील यांच्या पाठपुराव्याचे कौतुक करत, भविष्यातही अशाच प्रकारे जनतेच्या प्रश्नांसाठी प्रशासनाने तत्परतेने प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.



Post a Comment
0 Comments