दिशा लाईव्ह न्यूज- : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त डॉ. जे. जे. पंडित माध्यमिक विद्यालय, लोहारा येथे उत्साहपूर्ण वातावरणात योग दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गावातील धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व श्री. मंगलदास मोरे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री. पी. एम. सुर्वे सर यांच्या हस्ते श्री. मंगलदास मोरे यांचे स्वागत करून करण्यात आली. यावेळी विद्यालयातील शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात योग दिनाचे औचित्य साधून श्री. बी. एन. पाटील सर यांनी योगाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी योगामुळे शरीर, मन आणि बुद्धी यांचे संतुलन कसे राखले जाते याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित पाहुण्यांचा परिचयही त्यांनी करून दिला.
यानंतर प्रमुख पाहुणे श्री. मंगलदास मोरे तसेच विद्यालयातील सहकारी शिक्षकांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने योगासनांमध्ये सहभाग घेतला. रविवारचा दिवस असूनही विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती विशेष कौतुकास्पद ठरली.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना संदेश देताना, "योग फक्त एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता नियमित जीवनशैलीचा भाग बनवावा," असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. पी. एम. सुर्वे सर यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री. आर. के. सुरवाडे सर यांनी प्रभावीपणे पार पाडले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन आदरणीय पर्यवेक्षक श्री. व्ही. एस. पाटील सर यांनी केले.
अशा प्रकारे विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस अत्यंत उत्साहात, आनंदात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला.




Post a Comment
0 Comments