दिशा लाईव्ह न्यूज --::-- हिंदी चित्रपटसृष्टीतील १९८० आणि १९९० च्या दशकात आपल्या बुलंद, दमदार आणि भावपूर्ण आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मोहम्मद अजीज हे भारतीय चित्रपटसंगीतातील एक अजरामर नाव आहे. त्यांचा आवाज ऐकला की त्यातील ताकद, सुरांवरील विलक्षण प्रभुत्व, शब्दोच्चारातील स्पष्टता आणि भावनांची खोली मनाला थेट स्पर्श करून जाते. म्हणूनच आजही त्यांच्या गीतांची जादू तितकीच कायम आहे.
४ जुलै १९५४ रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या मोहम्मद अजीज यांचे मूळ नाव सय्यद मोहम्मद अजीज-उन-नबी होते. संगीताची आवड लहानपणापासूनच होती. बंगाली आणि उर्दू गाण्यांपासून सुरुवात करत त्यांनी अखेर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले.
त्यांना प्रेमाने "मुन्ना" असेही संबोधले जात असे. महान गायक मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांच्या निधनानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत प्रभावी पुरुष आवाजाची मोठी पोकळी निर्माण झाली होती. अशा वेळी मोहम्मद अजीज यांनी आपल्या असामान्य गायकीच्या बळावर ही पोकळी मोठ्या प्रमाणात भरून काढली. त्यांच्या आवाजात रफींची झलक जाणवत असली तरी त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली.
संगीतकार लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांचा त्यांच्यावर विशेष विश्वास होता. त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मोहम्मद अजीज यांनी असंख्य गाजलेली गीते गायली. उंच पट्टीतील सहज गायन, दमदार आवाज आणि प्रत्येक शब्दात भावना ओतण्याची कला यामुळे ते त्या काळातील सर्वाधिक व्यस्त पार्श्वगायक बनले.
लता मंगेशकरांसोबतचे सुरेल सोनेरी क्षण
लता मंगेशकर यांनी मोहम्मद अजीज यांच्याविषयी बोलताना त्यांना अत्यंत नम्र, मनमिळावू आणि सातही सुरांवर उत्कृष्ट प्रभुत्व असलेला गायक असे गौरविले होते.
दोघांनी मिळून अनेक अजरामर गीते दिली. त्यातील काही लोकप्रिय गीते—
पतझड सावन बसंत बहार
नाम सारे भूल जाने लगे
दिल दिया है जान भी देंगे
माता भी तू, पिता भी तू..
आज कल याद कुछ और रहता नहीं
तेरे मेरे बीच में..कोन आयेगा....
मुझे नींद न आये
या सर्व गीतांमध्ये दोघांच्या आवाजातील समतोल आणि भावपूर्ण सादरीकरण आजही संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करते.
आशा भोसले यांच्यासोबतची गाणी
आशा भोसले यांच्यासोबतही मोहम्मद अजीज यांनी अनेक संस्मरणीय गीते गायली. त्यांच्या आवाजातील जोश आणि आशाताईंची चपळ शैली यांचा सुंदर मिलाफ अनेक गीतांत अनुभवायला मिळतो.
अनुराधा पौडवाल यांच्यासोबतची लोकप्रिय गीते
अनुराधा पौडवाल यांच्यासोबत मोहम्मद अजीज यांनी अनेक भक्तिगीते तसेच चित्रपटातील युगुलगीते गायली. त्यांच्या आवाजातील भक्तिभाव आणि माधुर्य यामुळे ही गीते आजही लोकप्रिय आहेत.
अलका याज्ञिक यांच्यासोबतची अविस्मरणीय जोडी
अलका याज्ञिक यांनी त्यांच्या आठवणी सांगताना म्हटले होते की, दोघेही कोलकात्याशी संबंधित असल्याने त्यांची जुनी ओळख होती. मोहम्मद अजीज अत्यंत प्रेमळ, हसतमुख आणि मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्त्व होते.
दोघांनी गायलेली लोकप्रिय गीते—
तू ना जा मेरे बादशाह
उंगली में अंगूठी
दिल ले गई तेरी बिंदिया
दिल तेरा आशिक
आजही ही गाणी रेडिओ, स्टेज शो आणि संगीत मैफिलींमध्ये आवर्जून ऐकायला मिळतात.
संगीतकारांची प्रतिक्रिया
प्रख्यात संगीतकार राजेश रोशन यांनी म्हटले होते—
"सुंदर आवाज असलेले गायक अनेक असतात; पण गाण्यात प्राण फुंकण्याची कला फार थोड्यांकडे असते आणि मोहम्मद अजीज त्यापैकी एक होते."
अनु मलिक यांनी मर्द मधून त्यांना मोठी संधी दिली.
मर्द टांगेवाला....त्यांच्या मते मोहम्मद अजीज अत्यंत मेहनती, शिकण्याची तयारी असलेले आणि प्रत्येक गाण्यासाठी शंभर टक्के योगदान देणारे कलाकार होते. अमिताभ बच्चन यांच्या पडद्यावरील व्यक्तिमत्त्वाला साजेसा बुलंद आवाज देण्याचे मोठे श्रेयही त्यांनाच जाते.
मोहम्मद अजीज यांची सुपरहिट गीते
त्यांच्या कारकिर्दीतील अनेक गाणी आजही सदाबहार मानली जातात—
माय नेम इज लखन...
कुदरत का कानून....
तू मुझे कबूल...
तुमसे बना मेरा जीवन....
मैं से मीना से ना साकी से...
तू ना जा मेरे बादशाह...
दुनिया में कितना गम है...
उंगली में अंगूठी...
दिल दिया है जान भी देंगे...
आज कल याद कुछ और रहता नहीं...
नाम सारे भूल जाने लगे..
दोस्ती का नाम जिंदगी..
पतझड सावन बसंत बहार
आज सुबह जब मै जगा...
दिल ले गई तेरी बिंदिया...
दिल तेरा आशिक..
चांद गगन से,फुल चमन से..
प्यार का मंदिर कहते है..
'तेरी बेवफाइ का...
तू कल चला जायेगा..
ये जीवन जितनी बार मिले....
प्यार हमारा...अमर रहेगा...
या सह अनेक सुपरहिट गीत आहेत.
या प्रत्येक गीतातून त्यांच्या आवाजातील सामर्थ्य, भावपूर्ण सादरीकरण आणि सुरेलतेची जादू अनुभवायला मिळते.
स्वरांचा वारसा आजही जिवंत
काळ बदलला, संगीताची शैली बदलली आणि नव्या पिढीतील गायकांचे आगमन झाले. त्यामुळे मोहम्मद अजीज यांना पूर्वीसारख्या संधी कमी मिळाल्या. तरीही त्यांनी भारतासह परदेशातील असंख्य संगीत मैफिलींमधून आपल्या चाहत्यांशी नाते कायम ठेवले.
आजही त्यांच्या गाण्यांचे लाखो चाहते आहेत. रेडिओ, दूरदर्शन, यूट्यूब, संगीत मैफिली आणि सोशल मीडियावर त्यांची गीते तितक्याच प्रेमाने ऐकली जातात. त्यांच्या आवाजातील भाव, ताकद आणि सुरेलपणा कधीही विसरता येणार नाही.
आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त या महान गायकाला विनम्र अभिवादन.
स्वर कधीच मरत नाहीत… ते काळाच्या पलीकडे जाऊन पिढ्यान्पिढ्या घुमत राहतात. मोहम्मद अजीज यांचा आवाजही तसाच अमर आहे. त्यांनी गायलेले प्रत्येक गीत भारतीय चित्रपटसंगीताचा अमूल्य ठेवा आहे आणि त्यांचे नाव भारतीय संगीताच्या इतिहासात सदैव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.
भावपूर्ण अभिवादन… स्वरसम्राट मोहम्मद अजीज!


Post a Comment
0 Comments