पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी
दिशा लाईव्ह न्यूज --::-- "असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास..." संत तुकाराम महाराज यांच्या या अभंगातील संदेशाला साजेसा संघर्ष, जिद्द आणि अथक परिश्रमाचा आदर्श पहूरजवळील सांगवी येथील आदिवासी तरुण बबलू हसन तडवी याने आपल्या कर्तृत्वातून घालून दिला आहे. अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती, साधनांचा अभाव आणि अनेक संकटांवर मात करत त्याने नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेत यश संपादन केले. त्याच्या या यशामुळे सांगवीसह संपूर्ण पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण असून तो आज ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे.
बबलूचे बालपण अत्यंत संघर्षमय वातावरणात गेले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की, अनेकदा दोन वेळच्या जेवणाचीही चिंता भेडसावत असे. आई-वडील दिवसभर मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकत होते. अशा परिस्थितीत शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणे हे मोठे आव्हान होते. मात्र परिस्थितीपुढे हार न मानता बबलूने तिच्याच बळावर यशाचा मार्ग शोधला.
लहानपणापासूनच देशसेवेची तीव्र इच्छा मनात बाळगून त्याने पोलीस दलात भरती होण्याचे ध्येय निश्चित केले. आर्थिक अडचणींमुळे महागडे क्लास, मार्गदर्शन किंवा अभ्याससाहित्य घेणे शक्य नसतानाही त्याने स्वअभ्यासाचा मार्ग स्वीकारला. दिवस-रात्र मेहनत करत त्याने स्वतःला स्पर्धेसाठी सक्षम बनवले.
पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीसाठी आवश्यक सराव करण्यासाठी बबलू दररोज पहाटे पहूर ते शेंदूर्णी या मार्गावर नियमित धावत असे. उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा—कोणताही ऋतू असो, त्याच्या सरावात कधीही खंड पडला नाही. सातत्य, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर त्याने स्वतःची शारीरिक क्षमता अधिक मजबूत केली.
दरम्यान, आर्थिक संकटामुळे तयारी थांबण्याची वेळ आली होती. आवश्यक पुस्तके आणि इतर साहित्य खरेदी करण्याइतकेही पैसे नसल्याने त्याने धावण्याचा सराव करणाऱ्या इतर स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. मित्रांकडून मिळालेल्या अल्प आर्थिक मदतीतून त्याने अभ्याससाहित्य उपलब्ध करून घेतले आणि आपल्या स्वप्नांची वाटचाल सुरू ठेवली.
अनेक अपयश, कठोर परिश्रम आणि अखंड जिद्दीनंतर अखेर नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र पोलीस भरतीच्या निकालात बबलू हसन तडवी याची यशस्वी निवड झाली. निकाल जाहीर होताच कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अनेक वर्षे कष्ट करणाऱ्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. मुलाच्या यशाने त्यांच्या त्यागाचे चीज झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
बबलूच्या यशामुळे सांगवी, पहूर आणि परिसरातील ग्रामस्थ, शिक्षक, मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध स्तरांतील नागरिकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्याच्या यशाकडे केवळ नोकरी मिळाल्याच्या दृष्टीने नव्हे, तर संघर्ष, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या विजयाची प्रेरणादायी गाथा म्हणून पाहिले जात आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक तरुण आर्थिक अडचणींमुळे आपली स्वप्ने अपुरी ठेवतात. मात्र बबलू हसन तडवी याने "परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येय निश्चित असेल, मेहनत करण्याची तयारी आणि स्वतःवर विश्वास असेल तर यश निश्चित मिळते," हे आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.
ग्रामीण भागातील तसेच आदिवासी समाजातील युवकांसाठी बबलूचा संघर्षमय प्रवास प्रेरणादायी ठरत असून, त्याचे यश असंख्य तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती जिद्दीने पूर्ण करण्याची नवी ऊर्जा देणारे ठरत आहे.

Post a Comment
0 Comments