Type Here to Get Search Results !

पाचोरा तालुक्यातील रामेश्वर तांड्याला स्वतंत्र गावठाणाचा दर्जा द्या; अन्यथा ३ ऑगस्टपासून ‘तीव्र रस्ता रोको’ आंदोलनाचा इशारा



दिशा लाईव्ह न्यूज--::-- : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील मौजे रामेश्वर शिवारातील शासकीय जमीन गट क्रमांक ६५/अ ही 'संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजना' अंतर्गत रामेश्वर तांड्यासाठी स्वतंत्र गावठाण म्हणून घोषित करण्यात यावी, अशी मागणी गोर सेना भारत संघटनेने जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणात ग्रामपंचायतीकडून वस्तुस्थिती लपविणे, राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासनाची दिशाभूल होत असल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

निवेदनानुसार, रामेश्वर तांडा हा अनेक दशकांपासून अस्तित्वात असून येथे सुमारे ३५० ते ४०० बंजारा कुटुंबे वास्तव्यास आहेत. या कुटुंबांपैकी बहुतांश नागरिक भूमिहीन, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली असली, तरी स्वतंत्र गावठाण नसल्यामुळे घरकुलांचा प्रत्यक्ष लाभ मिळू शकलेला नाही, असा दावा करण्यात आला आहे.

गोर सेना भारतने आपल्या निवेदनात बंजारा समाजाच्या स्वतंत्र तांडा संस्कृतीचा आणि घटनात्मक हक्कांचा उल्लेख करत, शासनाने यापूर्वीच अशा तांड्यांच्या विकासासाठी विशेष धोरण स्वीकारल्याचे नमूद केले आहे. तसेच १९९३ पासूनच्या प्रशासकीय नोंदींमध्येही संबंधित शासकीय जमीन रामेश्वर तांड्याच्या विकासासाठी राखीव असल्याचा उल्लेख असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

याशिवाय, संबंधित ग्रामपंचायतीकडे स्वतःच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात शासकीय जमीन उपलब्ध असतानाही, रामेश्वर तांड्यासाठी राखीव असलेल्या जमिनीवर दावा करून प्रशासनाची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार केवळ राजकीय हेतूने होत असून त्यामुळे बंजारा समाजाच्या प्रतिनिधित्वावर आणि स्थानिक लोकशाही व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

निवेदनात पुढे असा इशाराही देण्यात आला आहे की, या वादामुळे दोन गावांमध्ये सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असून भविष्यात गंभीर तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून वस्तुस्थितीची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

मुख्य मागण्या :

रामेश्वर तांड्यासाठी गट क्रमांक ६५/अ स्वतंत्र गावठाण म्हणून तातडीने घोषित करावा.

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना प्राधान्याने जागा उपलब्ध करून द्यावी.

संबंधित ग्रामपंचायतीने केलेल्या कथित दिशाभूल प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.

सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा.

दरम्यान, ३ ऑगस्ट २०२६ पर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे ‘तीव्र रस्ता रोको व ठिय्या आंदोलन’ करण्यात येईल, असा इशारा गोर सेना भारत आणि रामेश्वर तांडा ग्रामस्थांच्या वतीने निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments