Type Here to Get Search Results !

‘द युवा ग्रामीण पत्रकार संघ’ पत्रकारांसह समाजातील घटकांना न्याय मिळवून देणारा संघ : राष्ट्रीय अध्यक्ष अन्सार शेख शिरूर येथे पश्चिम महाराष्ट्र राज्यातील जिल्हाध्यक्षांची आढावा बैठक; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप



दिशा लाईव्ह न्यूज --::--: -- पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, समाजातील अन्याय, अत्याचार आणि विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करीत असतात. मात्र, आजच्या काळात पत्रकारांवर हल्ले होण्याच्या घटना वाढत असून, पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याबरोबरच समाजातील विविध घटकांच्या हक्कांसाठी लढण्याचे काम ‘द युवा ग्रामीण पत्रकार संघ’ करीत आहे, असे प्रतिपादन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख यांनी केले.



कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय, शिरूर येथे द युवा ग्रामीण पत्रकार संघ, पश्चिम महाराष्ट्र राज्याच्या जिल्हाध्यक्षांची आढावा बैठक तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पदवाटप व नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची माहिती पुणे जिल्हाध्यक्ष प्रा. काशिनाथ आल्हाट यांनी दिली.


यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष अन्सार शेख म्हणाले की, द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे कार्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून, संघाची वाटचाल आता संपूर्ण देशभर सुरू आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटितपणे आवाज उठविणे, हे संघाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाते. पत्रकार समाजातील सामान्य नागरिक, वंचित घटक आणि पीडितांच्या प्रश्नांना शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम करतात. मात्र, हे काम करताना अनेकदा पत्रकारांनाच विविध अडचणी, दबाव, धमक्या तसेच हल्ल्यांना सामोरे जावे लागते. पत्रकार निर्भीडपणे सत्य मांडत असताना त्यांची सुरक्षितता आणि त्यांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. पत्रकारांसह समाजातील विविध घटकांना समानतेचा न्याय मिळवून देण्यासाठी द युवा ग्रामीण पत्रकार संघ कटिबद्ध आहे, असे शेख यांनी स्पष्ट केले.

‘हा संघ माझा आहे’ या भावनेने पत्रकारांनी संघटनेत निर्भीडपणे सहभागी व्हावे. देशभर संघाचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने सक्रियपणे योगदान देण्याची गरज आहे. संघटनेची ताकद ही केवळ पदांमध्ये नसून, पत्रकार आणि समाजाच्या प्रश्नांसाठी एकजुटीने उभे राहण्यात आहे, असेही अन्सार शेख यांनी सांगितले.


जनहिताच्या प्रश्नांसाठी रात्रंदिवस कार्य करा : शकील मनियार

राज्याध्यक्ष शकील मनियार यांनी आपल्या मनोगतात जनहिताच्या हक्कांसाठी पत्रकार संघाने सातत्याने काम करण्याची गरज व्यक्त केली. ‘द युवा ग्रामीण पत्रकार संघ हा जनहिताच्या हक्कांसाठी रात्रंदिवस काम करणारा संघ आहे’, अशी भावना जनमानसात निर्माण करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

आजच्या कार्यक्रमाला विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित आहेत. जिल्हाध्यक्षपद स्वीकारताना केवळ पदाची प्रतिष्ठा मिळत नाही, तर त्यासोबत मोठी जबाबदारीही येते. आपल्या पदाचा उपयोग पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच समाजहिताच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी करावा. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, अशी अपेक्षाही मनियार यांनी व्यक्त केली.


            नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण

कार्यक्रमाच्या निमित्ताने संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख आणि राज्याध्यक्ष शकील मनियार यांच्या शुभहस्ते विविध जिल्हाध्यक्ष तसेच इतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांसाठी तसेच जनहिताच्या विविध विषयांवर प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे जिल्हाध्यक्ष प्रा. काशिनाथ आल्हाट यांनी केले. त्यांनी संघाच्या आगामी कार्याचा आढावा घेत उपस्थित पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक कामाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिरूर तालुका अध्यक्ष नितीन मिसाळ यांनी केले.

कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन संघाच्या महिला उपाध्यक्षा ऐश्वर्या चासकर मॅडम यांनी प्रभावीपणे केले.

यावेळी विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी, पत्रकार आणि संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे संघटनेच्या आगामी वाटचालीला नवी दिशा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.



Post a Comment

0 Comments