Type Here to Get Search Results !

पहूर येथे साई ज्वेलर्समध्ये धाडसी चोरी; ६० हजारांचा ऐवज लंपास, सीसीटीव्हीचा डीव्हीआरही पळविला

 



पहूर प्रतिनिधी-ता. जामनेर 

दिशा लाईव्ह न्यूज :-: पहूर कसबे येथील अत्यंत वर्दळीच्या आणि बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या साई ज्वेलर्स या सराफा दुकानात अज्ञात अट्टल चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी करत सुमारे ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे, चोरीचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआरही पळवून नेला. आज (मंगळवारी) सकाळी दुकान उघडल्यानंतर ही घटना उघडकीस आली असून व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन रामदास सोनवणे यांच्या मालकीच्या साई ज्वेलर्स दुकानावर मध्यरात्री ते पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी डल्ला मारला. सर्वप्रथम त्यांनी दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर सॉक्स चढवून बाहेरील हालचालींचे चित्रण बंद होईल, याची खबरदारी घेतली. त्यानंतर शटर तोडून दुकानात प्रवेश करत दुकानातील मौल्यवान ऐवजाची चोरी केली. चोरीनंतर ओळख पटू नये म्हणून सीसीटीव्हीचा डीव्हीआरही सोबत घेऊन चोरटे पसार झाले.

या प्रकरणी साई ज्वेलर्सचे संचालक अर्जुन सोनवणे यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. चोरीची पद्धत, घटनास्थळावरील परिस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांची माहिती घेत तपासाला गती देण्याच्या सूचना दिल्या. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी राहुल पाटील करीत आहेत.

ही चोरी बसस्थानकाजवळील भरवस्तीत आणि दिवसभर मोठी वर्दळ असलेल्या भागात झाल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने चोरी करून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याने ही टोळी सराईत आणि अट्टल असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या घटनेनंतर व्यापारी वर्गातून पोलीस यंत्रणेने रात्रीची गस्त अधिक प्रभावी करावी, बाजारपेठ आणि बसस्थानक परिसरात नियमित गस्त वाढवावी तसेच संशयितांवर विशेष लक्ष ठेवून चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे. वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलीस प्रशासनाने अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करून नागरिकांचा विश्वास पुन्हा दृढ करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments