Type Here to Get Search Results !

खान्देशचे प्रतिपंढरपूर – श्रीक्षेत्र शेंदुर्णीतील भगवान श्री त्रिविक्रम महाराजांचे दिव्य दर्शन-आषाढि एकादशी निमित्त शेंदूर्णी येथे भाविकांचा जनसागर उसळणार.


दिशा लाईव्ह न्यूज --::--- खान्देशातील अध्यात्म, भक्ती आणि वैष्णव परंपरेचे एक तेजस्वी श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र शेंदुर्णी हे "खान्देशचे प्रतिपंढरपूर" म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी तसेच वर्षभर हजारो-लाखो भाविक येथे भगवान श्री त्रिविक्रम महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. आषाढी एकादशीच्या दिवशी तर शेंदुर्णी नगरीत भक्तीचा महासागर उसळलेला दिसतो.



भाविकांची अशी दृढ श्रद्धा आहे की, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तीन प्रहरांत भगवान श्री त्रिविक्रम महाराजांचे दर्शन घेतल्यास साक्षात पांडुरंगाच्या दर्शनाचे पुण्य लाभते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत मंदिरात दर्शनासाठी मोठी रांग लागलेली असते. दर्शनानंतर मंदिरासमोरील प्राचीन श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमंत यांचे दर्शन घेण्याचीही भाविकांची परंपरा आहे.

        संतश्रेष्ठ कडोजी महाराजांना झालेला दिव्य दृष्टांत

स्थानिक परंपरेनुसार, संतश्रेष्ठ कडोजी महाराजांना स्वप्नात भगवान विष्णूंनी दृष्टांत देत सांगितले, "मी तुझ्या गावातच आहे, मला बाहेर काढ." दुसऱ्या दिवशी त्यांनी ही गोष्ट तेव्हाच्या जहागीरदारांना सांगितली. सुरुवातीला कुणाचाही यावर विश्वास बसला नाही. मात्र काही दिवसांनी जहागीरदारांनाही तसाच दृष्टांत झाला. त्यानंतर समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील उकिरडा खोदण्यास सुरुवात झाली.

खोदकामात सर्वप्रथम अप्रतिम दगडी नक्षीकाम असलेली वराहाची विशाल मूर्ती सापडली. ती इतकी मोठी होती की ती बाहेर काढण्यासाठी तब्बल बारा बैलजोड्यांची मदत घ्यावी लागली. त्यानंतर भुयारात अखंड गंडकीच्या काळ्या पाषाणात घडविलेली, भगवान विष्णूंच्या दशावतारांनी सुशोभित, अत्यंत देखणी, नयनमनोहर आणि दिव्य अशी भगवान श्री त्रिविक्रम महाराजांची मूर्ती प्रकट झाली.

अशीही अख्यायिका सांगितली जाते की, मूर्ती बाहेर काढताना तिच्या नाकाला किरकोळ धक्का लागला आणि त्या ठिकाणाहून रक्तस्राव झाल्यासारखे दिसले. ही घटना आजही भाविक मोठ्या श्रद्धेने सांगतात आणि या मूर्तीच्या चैतन्यस्वरूपावर विश्वास व्यक्त करतात.

                       धार्मिक परंपरांचा प्रारंभ

भगवान श्री त्रिविक्रम महाराजांची मूर्ती प्रकट झाल्यानंतर संतश्रेष्ठ कडोजी महाराजांनी रथोत्सव, रुद्रेश्वर पायी दिंडी, विविध धार्मिक उत्सव, हरिनाम सप्ताह, भजन-कीर्तन, प्रवचन आणि भक्तीपर कार्यक्रमांची परंपरा सुरू केली. आजही या सर्व परंपरा मोठ्या भक्तिभावाने जपल्या जात आहेत.

पुरातत्त्व विभागाच्या माहितीनुसार, भगवान श्री त्रिविक्रम महाराजांची ही मूर्ती अत्यंत प्राचीन असून हजारो वर्षांपूर्वीची असल्याचे मानले जाते. तिची शिल्पकला, कलात्मकता आणि धार्मिक महत्त्व अभ्यासकांनाही आकर्षित करते.

                              संतपरंपरेचा अमूल्य वारसा

संतश्रेष्ठ कडोजी महाराजांचे चरित्र आणि आरती खान्देशातील विख्यात संतकवी कै. भीमराव मामा पारळकर यांनी रचली आहे. त्यांच्या प्रेरणेने सुरू झालेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा शंभर वर्षांहून अधिक काळ अखंडपणे सुरू असून आजही हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

               आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा

आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण शेंदुर्णी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघते. गावातील विविध संस्था, मंडळे, सामाजिक संघटना आणि सेवाभावी नागरिक यांच्या वतीने भाविकांसाठी चहा, दूध, फराळ, पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत आणि इतर आवश्यक सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातात. "अतिथी देवो भव" या संस्कृतीचे दर्शन येथे प्रत्येक भाविकाला घडते.

खान्देश, मराठवाडा, विदर्भ तसेच महाराष्ट्राच्या विविध भागांतून लाखो भाविक येथे येऊन भगवान श्री त्रिविक्रम महाराजांचे दर्शन घेतात. अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण झाल्याच्या अनुभूती सांगत दरवर्षी दर्शनासाठी येण्याचा संकल्प करतात.

                         प्रशासनाची सज्जता

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुलभ दर्शन मिळावे यासाठी नगरपंचायत, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, स्वयंसेवक आणि विविध सामाजिक संस्था सज्ज असतात. वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी, सुरक्षा आणि गर्दीचे नियोजन यावर विशेष भर दिला जातो.

                         भक्तांना विनम्र आवाहन

दिव्य तेज, अप्रतिम शिल्पकला आणि चैतन्यमय स्वरूप लाभलेल्या भगवान श्री त्रिविक्रम महाराजांचे दर्शन हा प्रत्येक भक्तासाठी अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव ठरतो. आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर किंवा वर्षातील कोणत्याही दिवशी श्रीक्षेत्र शेंदुर्णी येथे येऊन भगवान श्री त्रिविक्रम महाराज आणि समोरील श्रीराम मंदिरातील प्रभू श्रीराम यांचे दर्शन घ्यावे, हीच सर्व भाविकांना नम्र विनंती.

जय हरी विठ्ठल! जय श्री त्रिविक्रम महाराज!

— ॲड. देवेंद्र गोविंदराव पारळकर

चालक, श्रीरामचंद्र देवस्थान, शेंदुर्णी

Post a Comment

0 Comments