Type Here to Get Search Results !

कुऱ्हे (पानाचे) येथे राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टरांचा सन्मान; युवाशक्ती ग्रुपचा प्रेरणादायी उपक्रम



 प्रा.अरविंद बाविस्कर--कुऱ्हे (पानाचे), 

दिशा लाईव्ह न्यूज --::--- "पेशंट के लिए तो खुदा और भगवान है डॉक्टर, हर बीमारी का सोलुशन और समाधान है डॉक्टर" या भावपूर्ण ओळींप्रमाणे समाजासाठी अहोरात्र रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त युवाशक्ती ग्रुप, कुऱ्हे (पानाचे) यांच्या वतीने परिसरातील मान्यवर डॉक्टरांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

मानवाच्या दुःखावर फुंकर घालून वेदना कमी करण्याचे कौशल्य आणि सेवाभाव लाभलेल्या डॉक्टरांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी प्रत्येक डॉक्टरांना शुभेच्छापत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थितांनी डॉक्टरांच्या निःस्वार्थ सेवेला मानवतेची खरी सेवा असल्याचे गौरवोद्गार काढले.

यावेळी डॉ. भरत कळसकर, डॉ. अतुल पाटील, डॉ. योगेश महाजन, डॉ. साळी, डॉ. वराडे, डॉ. बारी, डॉ. समाधान बारी, डॉ. संजय बारी आणि डॉ. बडगुजर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात वक्त्यांनी सांगितले की, "डॉक्टरांकडे येणारा प्रत्येक रुग्ण समान असतो. त्यांच्यासाठी ना श्रीमंत-गरीब असा भेद असतो, ना धर्माचा विचार; त्यांच्या दृष्टीने रुग्णसेवाच सर्वोच्च धर्म असतो." डॉक्टरांचे समाजाप्रती असलेले समर्पण, सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठा यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युवाशक्ती ग्रुपचे सदस्य चेतन सपकाळे, विष्णू बाणाईत, गणेश शिंदे, विजय कोळी, दिगंबर वराडे, दिपक बारी, तुषार मेघे, तुषार बारी, महेश मेघे, भूषण शिंदे तसेच इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व पदाधिकारी, सदस्य, हितचिंतक आणि डॉक्टरांचे ग्रुपतर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

या उपक्रमाचे आई प्रतिष्ठान, कुऱ्हे (पानाचे) यांच्या वतीने मनापासून अभिनंदन व कौतुक करण्यात आले. समाजासाठी निःस्वार्थ भावनेने सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान म्हणजे खऱ्या अर्थाने मानवतेचा सन्मान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

"डॉक्टरांचा सन्मान म्हणजे मानवतेचा सन्मान!" या संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments