दिशा लाईव्ह न्यूज ---::---:: नूतन मराठा विद्यालय, जळगाव व मराठा उद्योजक कक्ष, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रोटवद येथील स्टार वन नॅचरल फार्मर प्रोड्युसर कंपनीचा शनिवारी (दि. ४ जुलै) विशेष सन्मान करण्यात आला. शेतकरी हितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
स्टार वन नॅचरल फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना रोटवद परिसरातील चार गावांतील शेतकरी गटांनी एकत्र येऊन केली आहे. कंपनीला अवघे एक वर्ष पूर्ण झाले असून, या अल्पावधीत शेतकऱ्यांच्या हितासाठी 'ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर कृषी सेवा केंद्र सुरू करण्यात आले. याशिवाय शेतकऱ्यांना एकाच छताखाली माती परीक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, दर्जेदार कृषी निविष्ठा पुरविण्याचे कार्यही सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आधुनिक व विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देत कंपनीने अल्पावधीत आदर्श निर्माण केला आहे.
कंपनीच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत नूतन मराठा विद्यालय व मराठा उद्योजक कक्ष, जळगाव यांच्या वतीने कंपनीचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी मराठा उद्योजक कक्षाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांना 'समाज जीवन गौरव पुरस्कार' प्रदान करून गौरविण्यात आले. आबासाहेब पाटील हे स्टार वन नॅचरल फार्मर प्रोड्युसर कंपनीचे मार्गदर्शक असून, त्यांच्या प्रेरणेतून कंपनी शेतकरी विकासाच्या विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जालिंदर सुपेकर (विशेष पोलीस महानिरीक्षक तथा उपमहासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य, मुंबई), राजेश मोरे (मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव), निलेश देविदास पाटील (शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जळगाव), कपिल जयकर पवार (उपसंचालक, आदिवासी विकास विभाग, नाशिक), निलेश रणजीत भोईटे (सचिव, ज.जी.म.वि. प्र. सह. समाज, जळगाव) तसेच अनिल तुकाराम पाटील (व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव) यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांनी स्टार वन नॅचरल फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या कार्याचे कौतुक करत, भविष्यातही शेतकरी विकासासाठी अशाच नावीन्यपूर्ण योजना राबवून अधिक यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सत्कार स्वीकारण्यासाठी स्टार वन नॅचरल फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सर्व संचालक उपस्थित होते. सन्मानाबद्दल कंपनीच्या सर्व संचालकांनी नूतन मराठा विद्यालय व मराठा उद्योजक कक्ष, जळगाव यांचे मनःपूर्वक आभार मानले.


Post a Comment
0 Comments