Type Here to Get Search Results !

अशी तशी नव्हे; चक्क नव्या कोरी बसचीच केली चोरी! धक्कादायक!!-जामनेर आगारातून मध्यरात्री नवी कोरी ‘जिजाऊ’ बस लांबवली; पंक्चर झाल्याने शहापूरजवळ सोडून चोरटा पसार


दिशा लाईव्ह न्यूज :- : पैसे, दागिने किंवा मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याच्या घटना आपण नेहमी ऐकतो; मात्र जामनेरमध्ये चक्क राज्य परिवहन महामंडळाची नवी कोरी बसच चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जामनेर आगारातून मध्यरात्री अज्ञात इसमाने ‘जिजाऊ’ बस पळवून नेली. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर बसचे पुढील चाक पंक्चर झाल्याने चोरट्याचा डाव फसला आणि त्याने बस शहापूरजवळ सोडून पलायन केले.

                   मध्यरात्री आगारातून बस गायब

जामनेर आगाराची एमएच १९, एनई ४२१४ क्रमांकाची नवी कोरी ‘जिजाऊ’ बस रविवारी रात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास आगारातून गायब झाली. मध्यरात्री बस आगारातून बाहेर गेल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. सकाळी बस निर्धारित ठिकाणी नसल्याचे लक्षात आल्यानंतर या घटनेची माहिती समोर आली.

              शहापूरच्या फरशी पुलावर बस आढळली

दरम्यान, सोमवारी सकाळी शहापूर गावातील ग्रामस्थांना खडकी नदीवरील फरशी पुलाजवळ एक बस बंद अवस्थेत उभी असल्याचे दिसून आले. गावातील रस्त्यावर अशा प्रकारे नवी बस उभी असल्याने ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली.

शहापूर येथे जामनेर आगारातील काही चालक व वाहक वास्तव्यास आहेत. त्यांना या बसची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बसची पाहणी केल्यानंतर ती जामनेर आगाराची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी आगार व्यवस्थापक दिनेश नाईक यांना याबाबत माहिती दिली.

                  पंक्चर झाल्याने चोरट्याचा डाव फसला

प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात इसमाने रात्री जामनेर आगारातून ही नवी कोरी बस बाहेर काढली आणि जामनेर शहरातून शहापूरच्या दिशेने नेली. मात्र, खडकी नदीवरील फरशी पुलाजवळ बसचे पुढील चाक पंक्चर झाले.

बस पुढे नेता येत नसल्याने संशयिताने बस घटनास्थळीच सोडून दिली आणि तेथून पळ काढला. त्यामुळे मोठी चोरी होण्यापूर्वीच बस पुन्हा मिळून आली.

                      जामनेर पोलिसांत तक्रार

ही नवी कोरी ‘जिजाऊ’ बस जामनेर आगारातून जळगाव–नेरी–जळगाव या मार्गावर नियमित धावत असते. प्रवाशांच्या सेवेसाठी वापरली जाणारी बस अशा पद्धतीने आगारातून पळवून नेल्याने एसटी प्रशासनातही खळबळ उडाली आहे.

आगार व्यवस्थापक दिनेश नाईक यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

              आगाराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह?

दरम्यान, आगारातून एवढी मोठी बस मध्यरात्री बाहेर काढली जात असताना सुरक्षा यंत्रणेच्या लक्षात हा प्रकार कसा आला नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आगाराच्या प्रवेश-निर्गमन व्यवस्थेवर तसेच सुरक्षा व्यवस्थेवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नवी कोरी एसटी बस चोरट्याने पळवून नेली आणि पंक्चर झाल्यामुळे ती शहापूरजवळ सोडून दिली, या घटनेने जामनेर परिसरात मोठी चर्चा रंगली असून, पोलिस तपासातून या धक्कादायक प्रकारामागील नेमके कारण आणि आरोपी कोण, हे स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

0 Comments