दिशा लाईव्ह न्यूज --::-- खान्देशच्या समृद्ध कलापरंपरेला आपल्या सुरेल आणि भावस्पर्शी आवाजातून वेगळी ओळख निर्माण करून देणारे पार्श्वगायक पी. गणेश हे मेणगाव, ता. जामनेर येथील सुपुत्र आहेत. आपल्या मातीतला संस्कार, संगीताची साधना आणि सुरांवरील विलक्षण हुकमत यांच्या बळावर त्यांनी गायन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज त्यांचा आवाज केवळ खान्देशपुरता मर्यादित राहिलेला नसून सातासमुद्रापार पोहोचला आहे.
विशेषतः ‘हनुमान अष्टक’ या भक्तिगीतातील त्यांच्या गायकीचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. पी. गणेश यांच्या आवाजातील अलौकिक गोडवा, उत्कट भक्तिभाव आणि शब्दाशब्दांतून जाणवणारी श्रद्धा या आरतीला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. त्यांच्या स्वरांमधील नैसर्गिक लय, सुरेलपणा आणि भावस्पर्शी माधुर्य ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडते. आरती ऐकताना मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र होते.
https://youtu.be/m5nbfTrfFnc?si=PqugF29YBnNeHxls लिंक वर क्लीक करून सुमधुर गीत नक्की ऐका.
संगीत क्षेत्रात त्यांना किशोर कुमार आणि कुमार सानू यांच्या गायकीची प्रेरणा लाभली. या महान गायकांच्या संगीताचा प्रभाव आत्मसात करत त्यांनी स्वतःची स्वतंत्र गायकी विकसित केली. अनेक दिग्गज गायक-गायिकांसोबत गीतगायन करण्याची संधी त्यांना मिळाली असून, देश-विदेशातील विविध कार्यक्रमांमधून त्यांनी आपल्या आवाजाची मोहिनी रसिकांवर पाडली आहे. जगातील विविध देशांमध्ये त्यांच्या गायनाचे कार्यक्रम झाले असून, परदेशातील रसिकांनाही त्यांच्या आवाजातील भारतीय संगीताची गोडी अनुभवता आली आहे.
‘खान्देशचा खरा अभिमान’ अशी ओळख निर्माण करणाऱ्या पी. गणेश यांनी आपल्या गायकीतून खान्देशच्या मातीचा सुगंध, येथील संस्कार आणि समृद्ध कलापरंपरा दूरवर पोहोचवली आहे. ग्रामीण मातीतून आलेल्या एका कलाकाराने आपल्या प्रतिभेच्या जोरावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.
विशेष म्हणजे एवढी मोठी कलात्मक कारकीर्द आणि देश-विदेशातील लोकप्रियता असूनही पी. गणेश यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत शांत, सुस्वभावी, साधे आणि मनमिळाऊ आहे. प्रसिद्धीच्या झोतात असतानाही आपल्या मातीशी, आपल्या माणसांशी आणि आपल्या गावाशी असलेली नाळ त्यांनी कायम जपली आहे. त्यामुळे त्यांच्या आवाजाइतकेच त्यांचे व्यक्तिमत्त्वही रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करते.
मेणगावच्या मातीतून उमललेला हा सुरेल स्वर आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि जगाच्या विविध भागांत पोहोचत आहे. त्यांच्या स्वरांमध्ये भक्ती आहे, भाव आहे, माधुर्य आहे आणि आपल्या मातीशी जोडलेली एक विलक्षण आपुलकी आहे.
पी. गणेश म्हणजे खान्देशच्या मातीचा सुरेल आवाज, भक्तीचा भावस्पर्शी स्वर आणि संगीतविश्वात आपल्या कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण करणारे एक गुणी व्यक्तिमत्त्व! त्यांच्या सुरेल वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा.



Post a Comment
0 Comments