दिशा लाईव्ह न्यूज :-: माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, कासमपुरा येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात, देशभक्तीमय वातावरणात आणि आनंदात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी शहापुरा येथील ज्येष्ठ नागरिक व प्रतिष्ठित व्यापारी श्री. सुदामसिंग शा. परदेशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सकाळी राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. धनराजशेठ परदेशी होते. ध्वजारोहणानंतर उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी राष्ट्रगीताचा सन्मानपूर्वक गायन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते, भाषणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन करत स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आणि देशाच्या स्वातंत्र्याची महती उपस्थितांसमोर मांडली.
या कार्यक्रमास गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांची विशेष उपस्थिती लाभली. यामध्ये श्री. सतीशभाऊ गवळी, पिंटुभाऊ पाकळ, यशवंत हटकर, रतनजी पांडे, नंदुभाऊ मर्मट, राजेंद्र खरे, गोपाल जोनवाळ, गोकूळ महेर, दिलीप मर्मट, राजू महेर, बैसाणे अप्पा (ग्रामसेवक), दिलीप कोळी, चंदू खरे, हिरालाल कायटे, नामदेव कोळी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष श्री. योगेशभाऊ राजपूत व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. किरण चौधरी सर यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांच्या कवायतीचे शिस्तबद्ध व प्रभावी संचालन ज्येष्ठ शिक्षक धोनी सर यांनी केले.
स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील श्री. सतीश राजपूत सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सौ. वानखेडे मॅडम व सौ. दीपिका मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आढाव सर यांनी उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक, शिक्षक व सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
शिस्तबद्ध कवायत, देशभक्तीपर गीते, विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक सादरीकरण आणि ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती यामुळे माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, कासमपुरा येथील स्वातंत्र्य दिन सोहळा अविस्मरणीय ठरला.




Post a Comment
0 Comments