दिशा लाईव्ह न्यूज :-- : जामनेर तालुक्यातील महिला शेतकरी गट फार्मर कप चळवळीत सक्रियपणे सहभागी होत असून, गटशेती, सामुदायिक निविष्ठा खरेदी, सामूहिक कामात सहभाग तसेच एसओपीचे (SOP) तंतोतंत पालन करून उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. या महिला गटांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी तालुक्यातील पुरुष शेतकरी गटांनी पुढाकार घेत अनोख्या पद्धतीने त्यांचा गौरव केला.
बुधवार, दि. ३ सप्टेंबर रोजी ऋषी महाराज वनक्षेत्र, रोटवद येथे स्टार वन फार्मर प्रोड्यूसर कंपनी, रोटवद व नांद्रा यांच्या पुढाकारातून वनभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात समर्थ महिला शेतकरी गट, क्रांती महिला शेतकरी गट, अन्नपूर्णा महिला गट, कृषिकन्या गट यांच्यासह मंगलमूर्ती पुरुष गट व बजरंग गट सहभागी झाले.
महिला शेतकरी गटांनी फार्मर कप चळवळीत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान करणे, तसेच विविध गटांमध्ये आपलेपणा आणि एकजुटीची भावना निर्माण करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. ‘माझ्या तालुक्यातील गट हे माझे कुटुंब’ ही भावना अधिक दृढ व्हावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
विशेष म्हणजे, रोजच्या स्वयंपाकाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला भगिनींना एका दिवसाचा दिलासा मिळावा म्हणून पुरुष शेतकरी गटातील सदस्यांनी स्वतः भल्या पहाटेपासून स्वयंपाकाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी चवदार व रुचकर भोजन तयार करून महिला भगिनींना मनसोक्त वनभोजनाचा आनंद दिला. पुरुषांनी स्वतः स्वयंपाक करून महिलांना दिलेला हा आनंदाचा क्षण उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला.
या उपक्रमासाठी पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक राजेश हिवरे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी फार्मर कप स्पर्धेबाबत मार्गदर्शन करत सर्व शेतकरी गटांना शुभेच्छा दिल्या. आगामी काळात अधिकाधिक शेतकऱ्यांनी या चळवळीत सहभागी व्हावे आणि सामूहिक प्रयत्नातून शेतीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राकेश पाटील (कृषी आत्मा), शाम दुसाने, मिलिंद पाटील, रविंद्र कांगणे, सुनील गायकवाड, कन्हैया महाजन (सहाय्यक कृषी अधिकारी), रुपेश बिऱ्हाडे (नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प समूह सहाय्यक) यांच्यासह विविध मान्यवर व शेतकरी गटांचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते वड व पिंपळ या देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच उपस्थित सर्व गटांनी फार्मर कप चळवळीत एकजुटीने काम करून राज्यस्तरीय बक्षीस मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला.
वनभोजनानंतर महिला शेतकरी गटातील सदस्यांनी ऋषी महाराज वनक्षेत्रातील निसर्गरम्य परिसराची मनसोक्त भटकंती केली. हिरवाईने नटलेल्या वनराईचे नैसर्गिक सौंदर्य अनुभवत महिलांनी आनंद लुटला. यावेळी निसर्गाच्या सान्निध्यात छायाचित्रे काढण्याचाही आनंद त्यांनी घेतला.
महिला शेतकरी गटांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी पुरुष शेतकरी गटांनी घेतलेला हा अनोखा पुढाकार सामूहिक शेती, महिला सक्षमीकरण आणि शेतकरी एकजुटीचा प्रेरणादायी आदर्श ठरला.





Post a Comment
0 Comments