Type Here to Get Search Results !

पहूर येथील श्रीक्षेत्र संगमेश्वर मंदिरात दोन भक्तनिवासांचा घाट भाविकांमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न; निकृष्ट कामाच्या आरोपांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह



ईश्वर हिवाळे-पहूर.ता. जामनेर

दिशा लाईव्ह न्यूज :-- : जामनेर तालुक्यातील पहूर येथे शेंदुर्णी मार्गावर देवळी व गोगडी या पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेल्या श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराच्या विकासकामांना आता वादाचे ग्रहण लागले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत सुमारे पाच कोटी रुपयांची विकासकामे सुरू असून मंदिर परिसरात दोन स्वतंत्र ठिकाणी वेगवेगळी भक्तनिवास उभारली जात आहेत. 

त्यातच सुरू असलेल्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप मंदिर ट्रस्टने केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदने देऊन सुरू असलेल्या बांधकामांची तांत्रिक व गुणवत्ता तपासणी करून चौकशी करण्याची मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी रोहन घुगे व जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनाही देण्यात आल्या आहेत .   यापूर्वीही जामनेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रमोद सुशिर यांच्या निदर्शनास या ट्रस्टने आणून दिले आहेत मात्र तरीही दुर्लक्ष होत असून बोगस काम सुरूच आहे .

         एकाच ठिकाणी सर्व सुविधायुक्त भक्तनिवास का नाही?

मंदिर परिसरात दोन स्वतंत्र ठिकाणी भक्तनिवास उभारण्यामागील नेमका उद्देश काय? कोणाच्या सूचनेवरून हा निर्णय घेण्यात आला? एकाच ठिकाणी भव्य, प्रशस्त व सर्व सुविधायुक्त भक्तनिवास उभारण्याऐवजी जागेचे विभाजन का केले जात आहे? अशा संतप्त भावना ट्रस्टकडून व्यक्त होत आहे .


यापूर्वी पर्यटन मंडळाच्या सुमारे तीन कोटी रुपयांच्या योजनेतून दोन स्वतंत्र ठिकाणी दोन सभामंडप उभारण्यात आल्याने जागेचा योग्य वापर झाला नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच मंदिर परिसरात महामार्गावरील डांबर मिश्रित डेब्रीस टाकण्यात आल्याने परिसराचे विद्रूपीकरण करण्यात आले असून, याबाबत ग्रामसभेत पत्र देऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

,माजी जिल्हा परिषद सदस्य तथा पंचायत समितीचे माजी सभापती बाबुराव केशव घोंगडे हे ओळखीचा आणि त्यांच्या प्रभावाचा गैरवापर करून संबंधित विभागाकडून मनमानी पद्धतीने काम करून घेतले जात असल्याचे श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे विश्वस्त किशोर बनकर यांनी सांगितले.

“कोणत्याही दबावाला बळी न पडता संपूर्ण कामाची निष्पक्ष गुणवत्ता तपासणी करावी. दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी; अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा ट्रस्टचे विश्वस्त  किशोर बनकर यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments