Type Here to Get Search Results !

रामेश्वरतांडा-कुऱ्हाडतांडा रस्ता दोन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षात खड्ड्यांमुळे वाहनधारकांची कसरत; विद्यार्थी, व्यापारी, रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास जामनेर-पाचोरा मार्गासाठी महत्त्वाचा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी


दिशा लाईव्ह न्यूज - -::----लोहारा परिसरातून जामनेर-पाचोरा तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी महत्त्वाचा असलेला रामेश्वरतांडा ते कुऱ्हाडतांडा रस्ता गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत असून, प्रवाशांचा प्रवास त्रासदायक आणि धोकादायक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे.

हा रस्ता परिसरातील अनेक गावांसाठी दळणवळणाचा महत्त्वाचा मार्ग आहे. जामनेर-पाचोरा या दोन्ही तालुक्यांशी संपर्कासाठी या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. परिसरातील विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना नियमितपणे या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. मात्र रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त

रस्त्यावर पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालकांना वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी लागते. विशेषतः रात्रीच्या वेळी खड्डे स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. आतापर्यंत या मार्गावर किरकोळ अपघातांच्या घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडण्याची शक्यता निर्माण होते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनांच्या देखभालीचा खर्चही वाढत असल्याची भावना वाहनधारकांनी व्यक्त केली आहे.

विद्यार्थी, रुग्ण आणि नोकरदारांची मोठी गैरसोय

परिसरातील अनेक गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी जामनेर, पाचोरा तसेच इतर ठिकाणी ये-जा करतात. तसेच रोजगारासाठी बाहेर जाणाऱ्या नोकरदारांनाही याच मार्गाचा वापर करावा लागतो. काही नोकरदारांना रात्री उशिरा किंवा पहाटे प्रवास करावा लागत असल्याने खराब रस्त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

रुग्णांना दवाखान्यात किंवा रुग्णालयात घेऊन जातानाही या रस्त्यावरील खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिक सांगतात. रस्त्याची दुरवस्था पाहता मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाचे लक्ष वेधले जाणार का?, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष

रस्त्याची दुरवस्था गेल्या दोन वर्षांपासून कायम असतानाही परिसरातील लोकप्रतिनिधी आणि संबंधित पदाधिकाऱ्यांकडून याबाबत ठोस भूमिका घेतली जात नसल्याची नाराजी नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्याऐवजी संपूर्ण रस्त्याचे दर्जेदार डांबरीकरण करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारक आणि परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

मोठ्या अपघाताची वाट पाहू नका

रस्त्याची सध्याची अवस्था पाहता संबंधित विभागाने वाहनधारकांच्या सहनशीलतेची परीक्षा न पाहता तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. खड्डे बुजविणे, रस्त्याची पाहणी करणे आणि आवश्यक त्या ठिकाणी नवीन डांबरीकरण करणे, अशी कामे तातडीने हाती घेण्याची मागणी होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीचे काम सुरू करावे तसेच लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नात लक्ष घालून संबंधित विभागाकडे पाठपुरावा करावा, अशी जोरदार मागणी  लोहारा, कासमपुरा,रामेश्वरतांडा, कुऱ्हाडतांडा ,कळमसरा तसेच परिसरातील वाहनधारक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.



दिनेश चौधरी, लोहारा

संपादक-:-दिशा लाईव्ह न्यूज.

Post a Comment

0 Comments