दिशा लाईव्ह न्यूज :-: घरासमोरील बाके हलविण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाची तक्रार देण्यासाठी मुलासोबत दुचाकीवरून पहूर पोलीस ठाण्याकडे निघालेल्या शेतकरी पित्याचा रस्त्यातच दुर्दैवी अंत झाला. मागावर आलेल्या कारने दुचाकीला धडक दिल्याने कुंभारी बुद्रुक येथील ज्ञानेश्वर उत्तम मोरे (वय ...) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा यश ज्ञानेश्वर मोरे गंभीर जखमी झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी बाळू उत्तम जोशी, अजय त्र्यंबक जोशी आणि शांताराम उत्तम जोशी या तिघांना अटक केली आहे. तिघांना रविवारी (दि. २७) जामनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
तक्रार देण्यासाठी निघाले अन् वाटेतच घात
कुंभारी बुद्रुक येथील ज्ञानेश्वर मोरे आणि त्यांचा मुलगा यश यांचा घरासमोरील बाके इतरत्र हलविण्यावरून वाद झाला होता. या घटनेची तक्रार देण्यासाठी दोघे शनिवारी दुचाकीवरून पहूर पोलीस ठाण्याकडे निघाले होते. मात्र, त्यांचा हा प्रवास पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच दुर्दैवी ठरला.
पोलिसांच्या माहितीनुसार, बाळू जोशी, अजय त्र्यंबक जोशी आणि शांताराम उत्तम जोशी हे त्यांच्या मागावर होते. त्यांनी कारने दुचाकीला धडक दिल्याचा आरोप आहे. या अपघातात ज्ञानेश्वर मोरे गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, तर मुलगा यश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत.
तक्रार देण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पिता-पुत्रावरच रस्त्यात घाला आल्याने मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
फरारी संशयितांना पकडण्यासाठी नातेवाईकांची ठाम भूमिका
घटनेनंतर पोलिसांनी बाळू उत्तम जोशी याला ताब्यात घेतले. मात्र, अजय जोशी आणि शांताराम जोशी हे दोघे फरार झाले होते. फरारी संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका मयताच्या नातेवाईकांनी घेतली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवून अजय जोशी याला उमाळे येथून, तर शांताराम जोशी याला तोंडापूर येथून ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले.
पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
ज्ञानेश्वर मोरे यांच्या मृत्यूने कुंभारी बुद्रुक गावावर शोककळा पसरली. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या अचानक मृत्यूने नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. रविवारी सकाळी पहूर ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सकाळी ११ वाजता कुंभारी बुद्रुक येथे पोलीस बंदोबस्तात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पडला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
राजपूत संघटनेचे निवेदन; शांततेचे आवाहन
या घटनेच्या निषेधार्थ राजपूत संघटनेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेकडो समाजबांधव उपस्थित होते.
दरम्यान, गावातील परिस्थिती चिघळू नये आणि शांतता कायम राहावी, यासाठी ह.भ.प. रवी महाराज यांनी तरुणांसह समाजबांधवांना शांतता राखण्याचे आवाहन केले. घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून, या प्रकरणातील पुढील तपासाकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments