दिशा लाईव्ह न्यूज- : सत्याला शब्दांची साथ देत, समाजातील प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देत आणि वाचकांच्या विश्वासाला सर्वोच्च स्थान देत सुरू झालेल्या ‘दिशा लाईव्ह न्यूज’चा आज तिसरा वर्धापनदिन साजरा होत आहे. गेल्या तीन वर्षांच्या या प्रवासात दिशा लाईव्ह न्यूजने केवळ बातम्या प्रकाशित केल्या नाहीत, तर पत्रकारितेतील विश्वास, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आजच्या डिजिटल युगात बातम्यांचा वेग प्रचंड वाढला आहे. मात्र बातमी किती वेगाने पोहोचते यापेक्षा ती किती अचूक, स्पष्ट, वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह आहे, याला दिशा लाईव्ह न्यूजने कायम महत्त्व दिले. ‘जे सत्य तेच प्रकाशित’ या भूमिकेतून गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पत्रकारिता सुरू आहे.
३५ लाख ७० हजार व्हिजिटरचा टप्पा
दिशा लाईव्ह न्यूजच्या तीन वर्षांच्या वाटचालीतील सर्वात मोठा टप्पा म्हणजे ३५ लाख ७० हजार व्हिजिटरचा टप्पा. वाचकांनी दाखविलेला हा विश्वास कोणत्याही जाहिरातीपेक्षा आणि आर्थिक पाठबळापेक्षा मोठा आहे.
या तीन वर्षांच्या कालावधीत २,४७५ बातम्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. स्थानिक प्रश्न, सामाजिक विषय, प्रशासनाशी संबंधित बाबी, नागरिकांच्या समस्या, विविध घटना ,संगीत,क्रिकेट, विनामूल्य वाढदिवस, निधन वार्ता, शेतकरी बांधवांच्या अडचणी,धार्मिक ,या सहअनेक समाजहिताच्या विषयांना दिशा लाईव्ह न्यूजने सातत्याने स्थान दिले.
वाचकांना बातमीची उत्सुकता निर्माण होईल, अशी अचूक, स्पष्ट, सुंदर आणि आलेखीय मांडणी करण्याचा प्रयत्न प्रत्येक बातमीत करण्यात आला आहे.
जाहिरात नाही, तर वाचकांचा विश्वास!
दिशा लाईव्ह न्यूजच्या या प्रवासातील आणखी एक महत्त्वाची आणि वेगळी बाब म्हणजे जाहिरातविना पत्रकारिता.
गेल्या तीन वर्षांत एकही जाहिरात न घेता, स्वतःच्या मेहनतीने आणि स्वखर्चाने बातम्या प्रकाशित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पत्रकारिता ही केवळ आर्थिक व्यवहार किंवा व्यवसाय म्हणून न पाहता, समाजाशी असलेली बांधिलकी म्हणून ती जोपासली जात आहे.
‘जाहिरात घेऊन पत्रकारिता... मुळीच नाही!’ ही भूमिका जपत दिशा लाईव्ह न्यूजने स्वच्छ पत्रकारितेचा आनंद घेतला आहे.
स्वतःचा व्यवसाय सांभाळत, त्यातून वेळ काढत आणि कोणत्याही जाहिरातीचे आर्थिक पाठबळ नसताना गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने बातम्या प्रकाशित करण्याचा हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. मात्र वाचकांचा विश्वास आणि मिळणारे प्रोत्साहन यामुळे हा प्रवास सुरू ठेवण्याचे बळ मिळत गेले.
पत्रकारितेचा ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव!
दिशा लाईव्ह न्यूजच्या मागे गेल्या ३० वर्षांचा पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव आहे. पत्रकारिता हा माझ्यासाठी व्यवसाय नसून जीवनाचा एक भाग, ज्ञान मिळवण्याचे माध्यम आणि आनंद देणारा छंद आहे.
गेल्या तीन दशकांत पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक चढ-उतार पाहिले. अनेक घटना जवळून अनुभवल्या. समाजातील विविध स्तरांशी संवाद साधला. या प्रदीर्घ अनुभवातून मिळालेली शिकवण दिशा लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बातमी लिहिताना कोणाला खुश करणे किंवा कोणाला नाराज करणे हा उद्देश नसतो. वाचकांसमोर वस्तुस्थिती मांडणे आणि सत्याला शब्द देणे, एवढाच प्रामाणिक प्रयत्न असतो.
चांगली बातमी कुणाला तरी खटकू शकते...
पत्रकारिता करताना अनेक अडचणी येतात. काही वेळा बातमीची दखल घेतली जाते, तर काही वेळा तीच बातमी काहींना नाराज करू शकते. एखाद्या प्रश्नावर आवाज उठविला की संबंधित व्यक्ती किंवा घटकांना ते आवडेलच असे नाही.
मात्र पत्रकारितेचा उद्देश कोणाची नाराजी टाळणे नसून समाजातील वास्तव समोर आणणे हा आहे.
दिशा लाईव्ह न्यूजच्या बातम्या काहींना आवडत असतील, काहींना खटकत असतील; काही जण नाराजही असतील. मात्र या सर्वांमध्ये एकच विनंती आहे—
माझे काही चुकत असेल तर मला नक्कीच तोंडावर स्पष्ट सांगा. माझी चूक असेल तर ती दाखवून द्या. मात्र माझ्या पत्रकारितेवर नाराज होऊ नका.
कारण माझ्याकडे वाचकांसाठी देण्यासारखे फक्त शब्दधन आहे; बाकी काहीही नाही.
अधिकाऱ्यांचेही मनापासून आभार!!
दिशा लाईव्ह न्यूजच्या विविध बातम्यांची अनेक वेळा संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासनाने दखल घेतली. नागरिकांच्या प्रश्नांवर प्रकाशित झालेल्या बातम्यांनंतर प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही झाल्याचे अनुभवही आले.
या सर्व काळात वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आणि बातम्यांची गांभीर्याने दखल घेणाऱ्या प्रामाणिक अधिकारी वर्गाचे दिशा लाईव्ह न्यूज परिवारातर्फे मनःपूर्वक आभार.
पत्रकारिता आणि प्रशासन यांच्यातील संवाद समाजहितासाठी महत्त्वाचा असतो. हा संवाद सकारात्मक पद्धतीने सुरू राहावा, अशीच अपेक्षा आहे.
वाचकांचा विश्वास हीच खरी संपत्ती.
दिशा लाईव्ह न्यूजकडे मोठे आर्थिक पाठबळ नाही. मोठ्या जाहिराती नाहीत. आणि जाहिरात घेतलेली नाही/ घेणार नाही. आणि मोठा व्यावसायिक लवाजमा नाही.मात्र वाचकांचा विश्वास नेहमीच सोबत आहे.
३५ लाख ७० हजार व्हिजिटरचा टप्पा गाठणे ही केवळ आकडेवारी नाही; तो हजारो-लाखो वाचकांनी दिलेला विश्वास आहे. प्रत्येक वाचकाने बातमी वाचली, प्रतिक्रिया दिली, बातमी पुढे पाठवली किंवा एखाद्या प्रश्नाकडे लक्ष वेधले—या प्रत्येक कृतीतून दिशा लाईव्ह न्यूजला बळ मिळाले.
या प्रवासात ज्यांनी प्रेम दिले, प्रोत्साहन दिले, चुका दाखवून दिल्या, बातम्या सुचवल्या आणि प्रत्येक अडचणीच्या काळात पाठबळ दिले, त्या सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार.
लेखणीतील बळ असेपर्यंत लिखाण सुरूच राहील!
पत्रकारितेच्या या प्रवासात कितीही अडचणी आल्या, कितीही उपद्व्याप झाले किंवा कितीही गैरसमज निर्माण झाले तरी लेखणी थांबविण्याचा विचार नाही.
माझ्या लेखणीत जोपर्यंत लिहिण्याचे बळ आहे, तोपर्यंत मी लिहित राहणार.
समाजातील प्रश्न मांडत राहणार. सामान्य माणसाचा आवाज बनण्याचा प्रयत्न करत राहणार. चांगल्या कामाची दखल घेत राहणार आणि चुकीच्या गोष्टींबाबत प्रश्न विचारत राहणार.
दिशा लाईव्ह न्यूजचा हा प्रवास माझा एकट्याचा नाही. हा आपल्या सर्वांचा प्रवास आहे.
आपण दिलेला आशीर्वाद, प्रेम आणि प्रोत्साहन असेच कायम सोबत राहू द्या.
दिशा लाईव्ह न्यूजच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त सर्व वाचक, हितचिंतक, मित्र, सहकारी, अधिकारी वर्ग आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार!
— आपला विश्वास, हीच आमची ताकद!
दिशा लाईव्ह न्यूज
संपादक : दिनेश चौधरी, लोहारा
संपर्क : 9309918930
पत्रकारितेचा ३० वर्षांचा अनुभव | स्वतःचा व्यवसाय सांभाळून सातत्यपूर्ण पत्रकारिता | प्रामाणिक आणि जाहिरातविना पत्रकारितेचा प्रयत्न नेहमीच सुरू राहील.



Post a Comment
0 Comments