Type Here to Get Search Results !

शिक्षिका होण्यापूर्वीच मालवली प्राणज्योत! नियतीने हिरावले स्वप्न; माहेर, सासर झाले सुन्न



दिशा लाईव्ह न्यूज :-: शिक्षक दिनाच्या अगोदर ज्या हातामध्ये आदराची नियुक्तीपत्रे पडणार होती, त्याच हातावर काळाने घाला घातला. पवित्र पोर्टलद्वारे नाशिक जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून नियुक्त झालेल्या अवघ्या २७ वर्षीय मेघा नैनाव या तरुणीचा शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान अल्पशा आजाराने दुर्दैवी अंत झाला. या आकस्मिक घटनेने सोयगाव तालुक्यातील जरंडी तसेच त्यांच्या मूळ गावी पिंपळगाव हरे (ता. पाचोरा) येथे शोककळा पसरली आहे.

मेघा नैनाव या मूळच्या पिंपळगाव हरे येथील रहिवासी होत्या. त्यांचे सासरे जरंडी येथे नामांकित वैद्यकीय व्यवसायिक असल्याने मेघा याही पती स्वप्नील नैनाव यांच्यासह जरंडी येथे राहत होत्या.

बुद्धिमत्तेच्या बळावर मेघा यांनी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नाशिक जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून निवड मिळवली होती. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणीही पूर्ण झाली होती. शिक्षक दिनाचे औचित्य साधून शनिवारी त्यांना अधिकृत नियुक्ती आदेश हातात मिळणार होते. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

      नियुक्तीचा आनंद अनुभवण्यापूर्वीच काळाचा घाला

गुरुवारी दिवसभर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच अचानक त्यांची प्रकृती बिघडली. शुक्रवारी सकाळी उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. नोकरीचे नियुक्तीपत्र हातात घेऊन शिक्षक म्हणून नव्या आयुष्याला सुरुवात करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मेघा यांना नियुक्तीचा आनंद अनुभवण्याची संधीही नियतीने दिली नाही.

अवघ्या २७व्या वर्षी झालेल्या त्यांच्या निधनामुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जरंडी व पिंपळगाव हरे परिसर सुन्न झाला असून, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता त्यांच्या मूळ गावी पिंपळगाव हरे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांसह नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेघा यांच्या पश्चात पती स्वप्नील नैनाव, लहान मुलगी, सासू, सासरे असा परिवार आहे. एकीकडे शिक्षक दिनाचा उत्सव सुरू असताना एका होतकरू भावी शिक्षिकेच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शिक्षिका होऊन विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे स्वप्न अधुरेच राहिले... नियतीने एका होतकरू तरुणीचे आयुष्य हिरावून घेतले.

Post a Comment

0 Comments