Type Here to Get Search Results !

कुऱ्हाड येथील महावितरण कर्मचाऱ्यांनी दाखवली माणुसकी; विजेचा धक्का बसलेल्या माकडाला दिले जीवदान! कर्मचाऱ्यांची समयसूचकता आणि डॉ. प्रणव भगत यांच्या उपचारांमुळे माकडाला मिळाले जीवदान; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव



         कुऱ्हाड प्रतिनिधी : सुनील लोहार

दिशा लाईव्ह न्यूज :-: कर्तव्य बजावताना माणुसकी जपली, तर मुक्या प्राण्यांचेही प्राण वाचू शकतात, याचा प्रत्यय कुऱ्हाड खुर्द येथील महावितरणच्या ३३ के.व्ही. उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी आणून दिला. विजेचा जोरदार धक्का बसून गंभीर जखमी झालेल्या एका माकडाला महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत पशुवैद्यकीय उपचार मिळवून दिले. त्यांच्या या संवेदनशीलतेमुळे माकडाला जीवदान मिळाले असून, परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

गुरुवारी सायंकाळी सुमारे साडेसहा वाजण्याच्या सुमारास कुऱ्हाड खुर्द येथील ३३ के.व्ही. उपकेंद्र परिसरातील झाडांवर माकडांचा एक कळप उड्या मारत होता. याचवेळी एका माकडाला उपकेंद्राबाहेरील विजेच्या तारांचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत माकड गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. आधीच विजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या या माकडावर परिसरातील कुत्र्यांनी हल्ला चढविला. त्यामुळे त्याची अवस्था आणखी गंभीर झाली.

ही घटना महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता माकडाचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी कुऱ्हाड येथील खासगी पशुवैद्यकीय डॉक्टर डॉ. प्रणव भगत यांना तातडीने पाचारण केले. डॉ. भगत यांनी घटनास्थळी पोहोचून जखमी माकडावर आवश्यक उपचार केले. दरम्यान, उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी माकडाला बिस्किटे व पाणी देत त्याची काळजी घेतली.

कर्मचाऱ्यांची तत्परता आणि डॉक्टरांच्या उपचारांमुळे काही वेळानंतर माकडाच्या हालचाली सुरू झाल्या. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसताच उपस्थित कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. काही वेळाने माकडाने पुन्हा हालचाल सुरू केली आणि ते झाडावर चढून निघून गेले. मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलेल्या या मुक्या जीवाला पुन्हा नैसर्गिक अधिवासात परतताना पाहून कर्मचाऱ्यांनाही समाधान वाटले.

             महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जपली भूतदया!

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा माणूस माणसालाही मदत करण्यास कचरतो; मात्र कुऱ्हाड येथील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी एका मुक्या प्राण्याचे दुःख ओळखून त्याच्या मदतीसाठी धाव घेतली. जखमी माकडाला केवळ वाचविण्याचा प्रयत्नच केला नाही, तर त्याला वैद्यकीय उपचार मिळवून देत त्याच्या खाण्या-पिण्याचीही काळजी घेतली. त्यांच्या या कृतीतून प्राणिमात्रांप्रती असलेली करुणा, भूतदया आणि माणुसकीचे दर्शन घडले.



हनुमानाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या माकडाचे प्राण वाचविण्याच्या या घटनेमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे. संकटात सापडलेल्या जीवाला मदतीचा हात देणे, हीच खरी माणुसकी असल्याचे या कर्मचाऱ्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.

या बचावकार्यात कुऱ्हाड ३३ के.व्ही. उपकेंद्रातील ऑपरेटर सुभाष मराठे, बाह्यस्रोत तंत्रज्ञ रोशन पवार व अंकुश कोळी, सुरक्षारक्षक अमोल बोरसे व राहुल बोरसे, बाह्यस्रोत ऑपरेटर पंकज रेणुके तसेच माकडावर उपचार करणारे पशुवैद्यकीय डॉक्टर डॉ. प्रणव भगत यांनी मोलाचे योगदान दिले.

या सर्वांनी दाखविलेली समयसूचकता, प्राण्यांप्रती असलेली संवेदनशीलता आणि सेवाभावी वृत्ती खरोखरच कौतुकास्पद आहे. मुक्या प्राण्यांचे प्राण वाचविण्यासाठी पुढे सरसावलेल्या या कर्मचाऱ्यांनी माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा सुंदर संदेश दिला आहे.

प्राणीमात्रांवर प्रेम करा, भूतदया जपा आणि संकटात सापडलेल्या जीवांना मदतीचा हात द्या—हीच या घटनेतून मिळणारी खरी शिकवण!




Post a Comment

0 Comments