दिशा लाईव्ह न्यूज -:-पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. इनोव्हा कारमधून वाहतूक करण्यात येणारा सुमारे ८ लाख ३३ हजार ६०० रुपये किमतीचा प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा पोलिसांनी हस्तगत केला. या कारवाईत सात लाख रुपये किमतीचे वाहनही जप्त करण्यात आले असून, एकूण १५ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. या प्रकरणी चाळीसगाव येथील वाहनचालकाला अटक करण्यात आली आहे.
नाकाबंदीच्या वेळी वाहनावर संशय
सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पथकाकडून नाकाबंदी सुरू होती. याचदरम्यान पहूर येथून चाळीसगावच्या दिशेने जाणारी इनोव्हा कार (क्र. एमएच १८ एजे ६५२५) पोलिसांच्या निदर्शनास आली. वाहनाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी कार थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने वाहन वेगाने पुढे नेल्याने पोलिसांनी पाठलाग करून कार अडवली.
त्यानंतर वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित केसरयुक्त विमल पानमसाला आणि व्ही-१ सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. पोलिसांनी तातडीने हा साठा ताब्यात घेत वाहनही जप्त केले.
१५ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत ८ लाख ३३ हजार ६०० रुपये किमतीचा प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू आणि सात लाख रुपये किमतीची इनोव्हा कार असा एकूण १५ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी इनोव्हा चालक आबा विठ्ठल पाटील (वय ५४, रा. माऊली नगर, चाळीसगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

Post a Comment
0 Comments