Type Here to Get Search Results !

सारोळा ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी पाचोरा तहसील कार्यालयासमोर उपोषण यशस्वी; प्रशासनाकडून चौकशीचे आश्वासन


दिशा लाईव्ह न्यूज --::--- मौजे सारोळा खुर्द (ता. पाचोरा) येथील ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगाच्या विकासकामांमध्ये कथित बोगस कामे आणि आर्थिक अफरातफर झाल्याचा आरोप करत, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी पाचोरा तहसील कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले उपोषण दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रशासनाच्या अधिकृत आश्वासनानंतर यशस्वीरीत्या मागे घेण्यात आले.

उपोषणकर्ते श्री. चंद्रकांत विजय पाटील आणि श्री. अमोल प्रभाकर पाटील यांनी या विकासकामांबाबत प्रश्न उपस्थित करत, कामांची प्रत्यक्ष पाहणी, कागदपत्रांची तपासणी व आर्थिक व्यवहारांची चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची मागणी केली होती.

                      प्रशासनाचे चौकशीचे आश्वासन

उपोषणाची सांगता करताना सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. पाटणकर यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. ग्रामपंचायत सारोळा खुर्द येथील १५ व्या वित्त आयोगाच्या विकासकामांबाबतच्या तक्रारींची सखोल चौकशी करण्यासाठी येत्या १२ ऑक्टोबर २०२६ रोजी चौकशी समिती ग्रामपंचायतीला प्रत्यक्ष भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीदरम्यान विकासकामे, कागदपत्रे आणि खर्चाच्या तपशीलाची कसून पडताळणी केली जाईल. 

या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.

               मान्यवरांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता

जिल्हा परिषद लोहटार खडकदेवळा गटाचे उंच शिक्षित नेतृत्व डॉ.भरतबापू पाटील पाचोरा, तालुका शिवसेना प्रमुख श्री. राजेंद्र पाटील, शिवसेना उपतालुका प्रमुख छोटू आप्पा सारोळा यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी देऊन उपोषण सोडण्यात आले.


यावेळी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. पाटणकर, विस्तार अधिकारी श्री. परदेशी व श्री. बोरसे, तसेच सारोळा येथील ग्रामसेवक श्री. सुनील पाटील उपस्थित होते. तसेच विशाल पाटील, संजय पाटील, महेंद्र अहिरे, गौतम अहिरे यांच्यासह सारोळा गावातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         ग्रामस्थांचे लक्ष आता १२ ऑक्टोबरच्या चौकशीकडे

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या विकासकामांच्या गुणवत्तेबाबत आणि खर्चाच्या विवरणाबाबत प्रशासनाकडून होणारी ही चौकशी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. चौकशी समितीच्या तपासणीतून वस्तुस्थिती समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून, आता सर्वांचे लक्ष १२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या चौकशीकडे लागले आहे.



Post a Comment

0 Comments