Type Here to Get Search Results !

जळगावात विजेच्या धक्क्याने माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; असोदा रोड परिसरात हळहळ मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या आईलाही विजेचा जोरदार धक्का; उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू



दिशा लाईव्ह न्यूज :-- : जळगाव शहरातील असोदा रोड परिसरात मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर) सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत विजेचा धक्का लागून माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. घराच्या मागील बाजूस असलेली वायर कट करण्यासाठी गेलेल्या मुलाला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या आईलाही विजेचा धक्का लागल्याने दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे असोदा रोड परिसरासह संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे.

या दुर्घटनेत सुनंदा राजू सपकाळे (वय ५०) आणि राहुल राजू सपकाळे (वय ३०, रा. असोदा रोड, जळगाव) अशी मृत माय-लेकाची नावे आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी सकाळी राहुल सपकाळे हे आपल्या राहत्या घराच्या मागील बाजूस असलेली वायर कट करण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक विद्युत प्रवाहाचा संपर्क आल्याने त्यांना तीव्र विजेचा धक्का बसला. मुलाला विजेचा धक्का बसल्याचे लक्षात येताच आई सुनंदा सपकाळे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे दोघेही गंभीर अवस्थेत खाली कोसळले.

घटनेचा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले.

एकाच कुटुंबातील आई आणि मुलाचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुनंदा सपकाळे यांचे पती राजू सपकाळे आणि इतर कुटुंबीयांना या घटनेमुळे मोठा मानसिक धक्का बसला आहे. रुग्णालयात नातेवाईक व परिचितांनी गर्दी केली होती.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, या दुर्घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

आईचे ममत्व आणि मुलाला वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न अखेर तिच्याच जीवावर बेतल्याने या घटनेने परिसरातील नागरिकांचे मन हेलावून गेले आहे. एका क्षणात हसते-खेळते कुटुंब दुःखाच्या छायेत आले असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments