Type Here to Get Search Results !

लोहारा येथील दत्तानाना पालीवाल यांचे दुःखद निधन श्री बालाजी महाराज मंदिराच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे निष्ठावंत सेवक हरपले; गावात शोककळा




दिशा लाईव्ह न्यूज --::---लोहारा, ता. पाचोरा, जि. जळगाव  येथील ज्येष्ठ नागरिक तथा श्री बालाजी महाराज मंदिराचे निस्सीम भक्त कै. दत्तात्रय नथुसा पालीवाल (दत्तानाना) यांचे बुधवार, दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच लोहारा गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून पालीवाल परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दत्तानाना हे लोहारा गावातील पुरातन श्री बालाजी महाराज मंदिराचे निस्सीम भक्त होते. श्री बालाजी महाराजांवरील त्यांची अपार श्रद्धा आणि मंदिराच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेप्रती असलेली त्यांची निष्ठा विशेष उल्लेखनीय होती. मंदिरातील पारंपरिक सोंगांची अखंड परंपरा जतन करून ती श्रद्धा, भक्तिभाव आणि समर्पित वृत्तीने नियमितपणे सुरू ठेवण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. अनेक वर्षांपासून त्यांनी या परंपरेचे जतन करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले.

धार्मिक परंपरा ही केवळ रूढी नसून ती गावाच्या संस्कृतीचा आणि श्रद्धेचा वारसा असते, याची जाणीव ठेवून दत्तानानांनी मंदिराच्या परंपरेशी आपले नाते अखेरपर्यंत जपले. त्यांच्या जाण्याने श्री बालाजी महाराज मंदिराच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यातील एक निष्ठावंत सेवक हरपला असून गावाच्या सांस्कृतिक वारशाची मोठी हानी झाली आहे.

दत्तानाना हे प्रकाश नथुसा पालीवाल यांचे ज्येष्ठ बंधू, तर जितेंद्र, राजेंद्र, मुकेश, अखिलेश, संजय व सतीश यांचे ताऊजी आणि उज्ज्वल, दीपक व शरद यांचे वडील होते. त्यांच्या निधनाने पालीवाल परिवाराने आपला आधारवड गमावला आहे.

अंत्ययात्रेचा कार्यक्रम : कै. दत्तात्रय नथुसा पालीवाल यांची अंत्ययात्रा गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता त्यांच्या राहत्या घरून, लोहारा येथून मुक्तिधामाकडे प्रस्थान करणार आहे.

त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व मोठा आप्तपरिवार आहे.

दत्तानानांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही. श्री बालाजी महाराजांच्या चरणी त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो आणि पालीवाल परिवारास या दुःखद प्रसंगातून सावरण्याचे बळ मिळो, हीच भावपूर्ण प्रार्थना.

भावपूर्ण श्रद्धांजली! ॐ शांती!

शोकाकुल : समस्त पालीवाल परिवार, लोहारा, ता. पाचोरा, जि. जळगाव, महाराष्ट्र.

Post a Comment

0 Comments