Type Here to Get Search Results !

पहूर येथील अपर तहसीलदार कार्यालयाचा निर्णय रद्द करा; शेंदुर्णी येथे कार्यालय मंजूर करा! अन्यथा शेंदुर्णीचा सोयगाव महसूल क्षेत्रात समावेश करा; शिवसेना नगरसेवक संजय सूर्यवंशी यांची शासनाकडे मागणी



दिशा लाईव्ह न्यूज :- : जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी शहर व परिसरातील नागरिकांच्या महसूलविषयक अडचणींचा विचार करून शेंदुर्णी येथे स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी शिवसेनेचे नगरसेवक संजय देविदास सूर्यवंशी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री तसेच जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करून शासनाचे लक्ष वेधले आहे.

शासनाने २३ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार पहूर येथे अपर तहसीलदार कार्यालय मंजूर केले आहे. मात्र, या निर्णयाचा फेरविचार करून पहूर येथील कार्यालयासंदर्भातील शासन निर्णय रद्द करावा आणि शेंदुर्णीची लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती, प्रशासकीय गरजा तसेच परिसरातील २५ ते ३० गावांचे शेंदुर्णीशी असलेले दैनंदिन व्यवहार लक्षात घेता अपर तहसीलदार कार्यालय शेंदुर्णी येथे मंजूर करावे, अशी मागणी सूर्यवंशी यांनी निवेदनातून केली आहे.

शेंदुर्णी शहराची लोकसंख्या सुमारे ५५ ते ६० हजारांच्या घरात असून, परिसरातील अनेक गावांसाठी शेंदुर्णी हे महत्त्वाचे व्यापारी व प्रशासकीय केंद्र आहे. महसूलविषयक विविध कामांसाठी नागरिकांना जामनेर येथे सुमारे २५ किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना वेळ, पैसा व श्रम खर्च करावे लागत असून मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. स्थानिक पातळीवरच अपर तहसीलदार कार्यालय उपलब्ध झाल्यास नागरिकांची ही गैरसोय दूर होऊन प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ होऊ शकते.

विशेष म्हणजे, शेंदुर्णी येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या मागणीसंदर्भात सन २०२२ पासून प्रशासकीय स्तरावर पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र, चार वर्षांचा कालावधी उलटूनही या मागणीवर अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, शेंदुर्णी व परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी सोयगाव तालुक्याच्या महसूल हद्दीत येत असल्याने शेतीविषयक तसेच महसूलविषयक कामांसाठी सोयगावशी जोडले गेल्यास नागरिकांना अधिक सोयीचे ठरू शकते. त्यामुळे शेंदुर्णी येथे स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास शासन स्तरावर अडचण असल्यास शेंदुर्णी शहरासह परिसरातील संबंधित गावांचा अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरील सोयगाव महसूल क्षेत्रात समावेश करण्यात यावा, अशी पर्यायी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

शासनाने स्थानिक जनतेच्या सोयीचा आणि प्रशासकीय गरजांचा विचार करून या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन संजय सूर्यवंशी यांनी केले आहे. अन्यथा सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, शेतकरी, व्यापारी, युवक आणि नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन, मोर्चा व जनआंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.

आता शासन या मागणीची दखल घेऊन शेंदुर्णीकरांच्या हिताचा निर्णय घेते की नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतो, याकडे शेंदुर्णी शहरासह परिसरातील गावांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments