पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी
दिशा लाईव्ह न्यूज :-: पहूर येथील गोगडी धरणात बुधवारी दुपारी बोट उलटून घडलेल्या दुर्घटनेत चार जणांचा जीव धोक्यात आला. धरणाच्या मध्यभागी फिरण्यासाठी गेलेल्या बोटीत अचानक पाणी शिरल्याने बोट उलटली. यामध्ये दोन तरुणी, त्यांचा चुलतभाऊ आणि बोटचालक पाण्यात पडले. मात्र, प्रसंगावधान राखत मदतीसाठी धावून आलेल्या चार धाडसी युवकांनी पाण्यात उड्या घेत चौघांचेही प्राण वाचविले. युवकांच्या धाडसामुळे मोठी जीवितहानी टळली असून त्यांच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खुशी लखन परदेशी (रा. डांगभुंगी) ही पळसखेडा (ता. सोयगाव) येथे नातेवाईकांकडे आली होती. बुधवारी खुशी, अचल संजय कवाळ आणि त्यांचा चुलतभाऊ अमोल रुमसिंग कवाळ हे गोगडी धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी धरणात बोटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आनंदा काशिनाथ भिल यांच्या बोटीतून ते धरणाच्या मध्यभागी गेले.
दरम्यान, अचानक बोटीचा तोल जाऊन बोट उलटली. त्यामुळे बोटीतील चारही जण पाण्यात पडले. अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पाण्यात बुडण्याची भीती निर्माण झाल्याने चौघांनीही जीव वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले. उलटलेल्या प्लास्टिकच्या बोटीचा आधार घेत त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली.
चार युवक ठरले संकटसमयी देवदूत!
धरण परिसरातील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कानावर पाण्यातून मदतीसाठी होणारा आक्रोश पडताच त्यांनी तातडीने धरणाच्या दिशेने धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पहूर पेठचे सरपंच अब्बू तडवी यांच्यासह पळसखेडा येथील पोहण्यात तरबेज असलेले शरीफ बादल तडवी, इरफान शकील तडवी, विजय भोई आणि अशोक पवार हेही घटनास्थळी दाखल झाले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शरीफ बादल तडवी, इरफान शकील तडवी, विजय भोई आणि अशोक पवार या चार युवकांनी क्षणाचाही विलंब न करता धरणाच्या पाण्यात उड्या घेतल्या. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी बुडणाऱ्या चौघांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
अखेर युवकांच्या अथक प्रयत्नांना यश आले. दोन्ही तरुणी, त्यांचा चुलतभाऊ आणि बोटचालक अशा चौघांनाही सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढण्यात आले. ऐन संकटाच्या वेळी दाखविलेल्या धाडसामुळे चार जणांना जीवदान मिळाले. या युवकांनी दाखविलेली तत्परता, धैर्य आणि माणुसकीची भावना सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
प्रशासनाकडून घटनास्थळी पाहणी
घटनेची माहिती मिळताच पहूर पेठचे सरपंच अब्बू तडवी, ग्रामविकास अधिकारी योगेश पालवे, माजी सभापती बाबुराव घोंगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे, पोलीस कर्मचारी राहुल पाटील, गजानन पाटील तसेच वैभव देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदार नानासाहेब आगळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. ग्रामविकास अधिकारी योगेश पालवे, माजी सभापती बाबुराव घोंगडे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी मदतकार्यात सहकार्य केले.
धाडस, प्रसंगावधान आणि माणुसकीचा प्रत्यय!
गोगडी धरणातील या दुर्घटनेने जलाशयांमध्ये बोटिंग करताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. बोट उलटल्यानंतर चार जण मृत्यूशी झुंज देत असताना मदतीसाठी धावून आलेल्या युवकांनी दाखविलेली तत्परता कौतुकास्पद आहे.
संकटाच्या प्रसंगी केवळ बघ्याची भूमिका न घेता स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचविणाऱ्या शरीफ बादल तडवी, इरफान शकील तडवी, विजय भोई आणि अशोक पवार या चार युवकांनी खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडविले. त्यांच्या या धाडसी कार्याचे पहूर, पळसखेडा परिसरासह सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments