सोयगाव - दत्तात्रय काटोले
दिशा लाईव्ह न्यूज -:- सोयगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, आता हा प्रश्न नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे. गुरुवारी दुपारी शेंदुर्णी बायपास रस्त्यावरील भारत पेट्रोलपंपासमोर मोकाट कुत्र्यांच्या कळपाने दुचाकीवरून जाणाऱ्या बाप-लेकावर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात दुचाकी घसरून वडील दीपक सखाराम घन जखमी झाले, तर अवघ्या दोन वर्षीय शिवांश या चिमुकल्याच्या पायाचे कुत्र्यांनी लचके तोडले. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दीपक घन हे आपल्या मुलाला सोयगाव बसस्थानकावरून दुचाकीने घरी घेऊन जात असताना भारत पेट्रोलपंपासमोर २० ते २५ मोकाट कुत्र्यांच्या कळपाने त्यांच्या दुचाकीचा पाठलाग सुरू केला. कुत्रे दुचाकीच्या मागे धावत आल्याने चालकाचा ताबा सुटला आणि दुचाकी रस्त्यावर घसरली. दोघेही खाली पडताच कुत्र्यांनी चिमुकल्या शिवांशवर हल्ला करून त्याच्या पायाचे लचके तोडले. परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत कुत्र्यांना हुसकावून लावल्याने पुढील अनर्थ टळला.
जखमी बाप-लेकाला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित पाटील यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर गंभीर जखमी शिवांशला पुढील उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
नगरपंचायतीचे दुर्लक्ष किती दिवस सहन करायचे?
सोयगाव शहरातील बसस्थानक, आठवडे बाजार, शाळा परिसर, मुख्य रस्ते आणि वसाहतींमध्ये मोकाट कुत्र्यांचे कळप मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. यापूर्वीही कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडल्या असून नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यांचा वाढता उपद्रव हा केवळ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न राहिलेला नसून, सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न बनला आहे.
विशेष म्हणजे, लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि दुचाकीस्वार यांना दररोज जीव मुठीत धरून रस्त्याने जावे लागत आहे. कुत्र्यांच्या कळपामुळे दुचाकीस्वारांचा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. एखाद्या निष्पाप बालकाचा जीव गेल्यानंतरच नगरपंचायत प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
आश्वासन नको, प्रत्यक्ष कारवाई हवी!
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संभाजीराव देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, नागरिकांना आता केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष कृती अपेक्षित आहे. कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण, सुरक्षित पकड मोहीम आणि पशुसंवर्धन नियमांनुसार योग्य व्यवस्थापन यासाठी नगरपंचायतीने तातडीने ठोस कृती आराखडा राबवावा, अशी मागणी होत आहे.
शहरातील नागरिकांच्या जीविताची जबाबदारी कोणाची? मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकली मुले जखमी होत असताना प्रशासन आणखी किती घटनांची वाट पाहणार? सोयगाव नगरपंचायतीने या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांच्या संतापाला सामोरे जावे लागेल.

Post a Comment
0 Comments