Type Here to Get Search Results !

प्रशिक्षणातील ज्ञानातून थेट वर्गातील विद्यार्थी घडवा : प्राचार्य डॉ. अनिल झोपे जामनेर येथील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण केंद्रास अधिकाऱ्यांची भेट; आज रविवारी प्रशिक्षणाचा समारोप


पहूर, ता. जामनेर, प्रतिनिधी- सौ.गीता भामेरे.

 दिशा लाईव्ह न्यूज -:--: शिक्षक प्रशिक्षण हे केवळ प्रमाणपत्र मिळविण्याचे साधन नसून, शिक्षकांच्या ज्ञान, कौशल्य व अध्यापन दृष्टिकोनात सकारात्मक बदल घडविण्याची संधी आहे. प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान आणि कौशल्ये प्रत्यक्ष वर्गातील अध्यापनात उतरवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी केले.

जामनेर येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहा दिवसीय वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण केंद्रास त्यांनी भेट देऊन प्रशिक्षणाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी आभासी प्रणालीद्वारे प्रशिक्षणार्थी शिक्षकांशी संवाद साधला.

प्रशिक्षण केंद्रातील विविध सत्रांची पाहणी करताना अधिकाऱ्यांनी अध्ययन-अध्यापन पद्धती, गटचर्चा, सहभागात्मक प्रक्रिया, कृतीआधारित उपक्रम, ऑनलाइन उपस्थिती नोंदणी, प्रशिक्षणार्थींचे स्वाध्याय आणि दैनंदिन वेळापत्रकाचे नियोजन यांची माहिती घेतली. प्रशिक्षणातील शिस्त, शिक्षकांचा सक्रिय सहभाग आणि उपक्रमशीलता पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. सी. डी. साळुंखे यांनी शिक्षकांनी काळानुरूप अद्ययावत राहून विद्यार्थ्यांच्या क्षमता, आवड, गरजा व अध्ययनशैलीनुसार आनंददायी आणि परिणामकारक अध्यापन करावे, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, सर्जनशीलता, समस्या निराकरण क्षमता आणि जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करण्यासाठी शिक्षकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असेही त्यांनी नमूद केले.

        राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व आधुनिक तंत्रज्ञानावर भर

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, बदलते शैक्षणिक तंत्रज्ञान, विद्यार्थीकेंद्रित अध्ययन आणि कौशल्याधारित शिक्षण या बाबींवर प्रशिक्षणादरम्यान विशेष भर देण्यात आला. शिक्षकांनी अध्यापनात नावीन्यपूर्ण प्रयोग राबवून विद्यार्थ्यांना केवळ पाठांतरापुरते मर्यादित न ठेवता विचारशील, आत्मविश्वासपूर्ण, स्वावलंबी आणि कृतीशील बनवावे, हा प्रशिक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश ठरला.


यावेळी डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. सी. डी. साळुंखे, प्रशिक्षण समन्वयक तथा उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे आणि शिक्षण विस्तार अधिकारी संजय पाटील उपस्थित होते. प्रशिक्षण केंद्रातील शिक्षकांशी अधिकाऱ्यांनी संवाद साधला.


प्रशिक्षणात विषयतज्ज्ञ व सुलभक म्हणून महेंद्र नाईक, मंगला जवळेकर, सुदाम चव्हाण, डॉ. रत्नाकर सुतार, प्रा. अनिता शेळके, संजय पाटील, शंकर भामेरे, आकाश तायडे, मिलिंद वासकर, राजेश सांगोरे, दत्तप्रसाद पाटील, विनोद नाईकडा, श्रीमती ए. एस. पाटील, संगीता पालवे, रवींद्र कोळी, राजेश्वरी राजपूत, प्रा. अश्विनी कांबळे आणि प्रवीण पाटील मार्गदर्शन करीत आहेत. सहसमन्वयक महेंद्र नाईक प्रशिक्षणाचे उत्कृष्ट नियोजन व समन्वय साधत आहेत.


दहा दिवसांच्या प्रशिक्षणातून प्राप्त ज्ञान, अनुभव आणि शैक्षणिक दृष्टिकोन प्रत्यक्ष शाळांमध्ये रुजविण्याचा संकल्प प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी केला असून, या प्रशिक्षणाचा समारोप आज होणार आहे. प्रशिक्षणातून घडलेला शिक्षक आणि त्याच्या अध्यापनातून घडणारा विद्यार्थी, हीच या उपक्रमाची खरी फलश्रुती ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments