पहूर -:- पहूर,ता. जामनेर येथे आज सकाळी प्लग आणि वायर यांची जोडणी करत असताना विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना पहूर येथे आज दि.22 रोजी बुधवारी सकाळच्या सुमारास घडली.यावेळी नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवनगर भागात राहणाऱ्या दीपक सुरेश वारुळे हा तरुण प्लग आणि वायर यांची जोडणी करत असताना त्यास विजेचा जबर धक्का बसल्याने त्याची शुद्ध हरपली. शेजारील रहिवाशांनी त्यास तातडीने उपचारार्थ पहूर ग्रामीण रुग्णालयात हलविले.
पहूर ग्रामीण रुग्णालयात डॉ. नजमुद्दीन तडवी, डॉ. रुपाली पाटील, परिचारिका योगिता नागरे, वैशाली पाटील यांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. उपचारासाठी जळगावला नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली .
ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेद करण्यात आले. सायंकाळी सहा वाजता शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले . त्याच्या पश्चात आई व विवाहित बहीण आहे . याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Post a Comment
0 Comments