दिशा लाईव्ह न्यूज --::--- गेल्या ५ दिवसांपूर्वी पाचोरा तालुक्यात ढग फुटी मुळे जवळपास 10 गावांचे अतोनात नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहांनी झाली नाही हे महत्वाचे आहे.
पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक येथे आज रोजी हृदय पिळवटून टाकणारी शोकांतिका घडली. हिवरा नदीच्या पात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाने झडप घातली. १६ वर्षीय निकिता नदीकाठावर पाय घसरून पाण्यात पडली आणि प्रचंड प्रवाहात वाहून गेली.
भाचीला वाचविण्यासाठी मामीनेही पाण्यात उडी घेतली. मात्र तिला पोहता न आल्याने तीही वाहू लागली. हे दृश्य पाहताच गावकऱ्यांनी आरडाओरड करत धाव घेतली व जीवाच्या आकांताने प्रयत्न करून मामीला वाचविले. पण दुर्दैवाने निकिताचा काहीही थांगपत्ता लागला नाही.
घटनेनंतर संपूर्ण गावातील तरुण, विशेषतः भिल्ल समाजातील ४०-५० युवक, संध्याकाळपर्यंत नदीत उतरून शोध घेत होते. तरीसुद्धा नदीच्या पाण्यात लुप्त झालेल्या मुलीचा शोध लागला नाही.
दरम्यान, ही बातमी घरी पोहोचताच ७२ वर्षीय आजोबा शामराव विठ्ठल खरे यांनी नातीच्या दुर्घटनेचा धक्का सहन न करता जागीच प्राण सोडले. एका घरातील दोन जीव एका दिवसात हिरावून नेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य *पद्मसिंग पाटील* आणि आमदार *किशोर पाटील* यांनी तातडीने विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू करण्यात आले.
या दुर्दैवी प्रसंगाने वडगाव टेक परिसरात शोककळा पसरली आहे. निकिताच्या शोधासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत.


Post a Comment
0 Comments