दिशा लाईव्ह न्यूज-:- जामनेर (प्रतिनिधी) : सध्या जळगांव जिल्यात भ्रष्टाचाराने डोके वर काढले आहे.मात्र जिल्ह्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधीला या गंभीर प्रश्नांवर लक्ष द्यायला वेळ मिळत नाही का?असा संतप्त सवाल नागरिकांमधून होत आहे.
जामनेर तहसील कार्यालयात तब्बल ₹२१.६३ लाखांची शासकीय फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सहाय्यक महसूल अधिकारी हर्षल विश्वनाथ पाटील (रा. भुसावळ) यांनी बनावट शासकीय आदेश तयार करून ही फसवणूक केल्याचा आरोप असून, तहसीलदार नानासाहेब श्रीपती आगळे यांनी स्वतः पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
१२ सप्टेंबर रोजी गट क्रमांक ८३६/२ च्या ७/१२ उताऱ्याची तपासणी करताना धारणा प्रकार वर्ग २ वरून वर्ग १ मध्ये बदल झाल्याचे आढळले. यासाठी जोडलेल्या फेरफार नोंद क्रमांक ४२२५६ मधील आदेश संशयास्पद वाटला. आदेशावर ई-ऑफिस प्रणालीचा संदर्भ क्रमांक नसल्याने त्याच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
सखोल तपासणीदरम्यान कळाले की, मूळ अर्ज तहसीलदारांनी २५ जुलै रोजी नजराणा न भरल्यामुळे निकाली काढला होता. मात्र आरोपी पाटील यांनी त्याच पत्रावरील तहसीलदारांच्या सहीचा गैरवापर करून फोटोशॉपद्वारे बनावट आदेश तयार केला.खोट्या आदेशात जमिनीचे बाजारमूल्य ₹४३,२६,५७० दाखवून शासनाकडे ₹२१,६३,२८५ नजराणा रक्कम जमा झाल्याचा खोटा दाखला तयार करण्यात आला. यासाठी MH016895725202526E हा बनावट चलन क्रमांक वापरण्यात आला.
मात्र शासनाच्या GRAS प्रणालीवर या रकमेची कोणतीही नोंद आढळली नाही.तहसीलदार आगळे यांनी चौकशीदरम्यान आरोपीला सामोरे केले असता, पाटील यांनी आर्थिक मोहापोटी आदेश बनावट तयार केल्याची कबुली दिली.
त्यांनी व्हॉट्सॲपवर तहसीलदारांना पत्र पाठवून चुकीची कबुली देत शासनाची रक्कम भरण्याची तयारी दर्शवली.या प्रकरणी जामनेर पोलिसांनी C.R. क्रमांक 313/2025 नोंदवून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 316, 318, 336(2), 336(3), 337, 338, 339, 340(2), 341(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास सपोनि स्वप्निल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
तहसीलदार आगळे यांनी जलदगतीने कारवाई करत पोलिसांत फिर्याद दाखल केली. महसूल विभागातील अप्रामाणिक कृत्यांना आळा घालण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरले आहे. शेतकरी व नागरिकांनी या कृतीचं स्वागत करत प्रतिक्रिया दिली की “शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी तहसीलदार साहेबांचं पाऊल धाडसी व स्वागतार्ह आहे.”या घटनेनंतर तालुक्यातील वर्ग २ धारणा जमिनींची फेरतपासणी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
शासन महसुलात डल्ला घालणाऱ्यांना थांबवण्यासाठी व्यापक तपासाची गरज आहे, असा सूर नागरिकांच्या चर्चेतून उमटत आहे.

Post a Comment
0 Comments