पहूर प्रतिनिधी-- ता. जामनेर –
दिशा लाईव्ह न्यूज --::-- शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पहूर येथे भव्य 'दुर्गा दौड' चे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने संपूर्ण गावात उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण पसरले होते.
गावातील सर्व प्रमुख रस्त्यांवरून दुर्गा दौड काढण्यात आली. यावेळी भारतीय संस्कृतीचा गौरव अधोरेखित करत राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांसारख्या थोर विभूतींच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
दौड दरम्यान संतोषी माता मंदिर, जय भवानी माता मंदिर, दुर्गा भवानी माता मंदिर आणि इतर अनेक मंडळांच्या दुर्गा देवीचे दर्शन घेत दुर्गा दौड संपूर्ण गाव फेरीत निघाली.
या दौडीत अबालवृद्ध, माता-भगिनी यांचा मोठा सहभाग होता. तरुणांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती. भगवे फेटे परिधान केलेले तरुण, हातात त्रिशूल, भगवे ध्वज आणि प्रतीकात्मक तलवारी घेऊन शौर्य आणि संस्कृतीचे दर्शन घडवत होते.
संपूर्ण नवरात्रोत्सवात दररोज सकाळी या दुर्गा दौडीचे आयोजन करण्यात आले होते. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर या दौडीचा समारोप करण्यात आला.
दुर्गा दौड मुळे गावात नवचैतन्य, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक एकतेचा संदेश पसरला. शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी अशा या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments