Type Here to Get Search Results !

निमखेडी पाझर तलावाचा सांडवा फुटल्याने शेतकऱ्याचे कोट्यवधींचे नुकसान – शासन मदतीसाठी कुठे? "भाकरीच हिरावून नेली..." – शेतकऱ्याची आर्त हाक


                         दत्तात्रय काटोले / प्रतिनिधी, सोयगाव 

दिशा लाईव्ह न्यूज --::-- सोयगाव तालुक्यातील निमखेडी शिवारात नुकत्याच झालेल्या ढगफुटीमुळे भीषण नैसर्गिक संकट उभं राहिलं असून, निमखेडी पाझर तलावाचा सांडवा फुटल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तब्बल ६०० एकरवरील कपाशीची पिके वाहून गेली, तर काही शेतकऱ्यांची जमीनसुद्धा खरडून वाहून गेल्याने त्या शेतकऱ्यांसमोर आता उध्वस्त आयुष्याचा प्रश्न उभा राहिला आहे.


विशेष म्हणजे, शेतकरी बाबाजी धनसिंग परदेशी यांच्या गट क्रमांक १०६ मधील ३ हेक्टर ८० आर, तर अनिताबाई बाबाजी परदेशी यांच्या गट क्रमांक ३३ मधील ७१ आर जमीन पिकांसह खरडून वाहून गेली आहे. हाती येणारे पिकच नव्हे, तर जगण्यासाठीचा आधारच निसर्गाने हिरावून घेतल्याने बाबाजी परदेशी यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले.

                           काय घडलं नेमकं?

१५ सप्टेंबर रोजी निमखेडी व घोसला परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे निमखेडी येथील पाझर तलावाचा सांडवा अचानक फुटला. सांडव्याचे पुराचे पाणी थेट शेतामध्ये घुसल्याने पिकांचे आणि जमीनदोन्हींचे अक्षरशः धिंडवडे उडाले. काही शेतजमिनी इतक्या प्रमाणात वाहून गेल्या की त्या जमिनीचे अस्तित्वच मिटल्यासारखे झाले आहे.

"भाकरीच हिरावून नेली..." – शेतकऱ्याची आर्त हाक

"हाती येणारी भाकरीच हिरावून गेली... आता सरकारनेच आधार द्यावा, नाहीतर आमचं जीवन उद्ध्वस्त झालं," अशी आर्त हाक बाबाजी परदेशी यांनी दिली आहे. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून परिसरातील नागरिकही भावविवश झाले.

                      शासनाने लक्ष देणे गरजेचे

या घटनेनंतर शासन, महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी अद्याप घटनास्थळी पोहोचलेले नाहीत, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांच्या अश्रूंना पुसण्यासाठी, आणि त्यांच्या उध्वस्त शेतीला नवसंजीवनी देण्यासाठी तात्काळ पंचनामे करून भरपाईची रक्कम मंजूर करणे अत्यावश्यक आहे.

निसर्गाचा कोप सहन करणाऱ्या या शेतकऱ्यांसाठी शासनाने आता तरी जागं व्हावं, हीच अपेक्षा!

Post a Comment

0 Comments