Type Here to Get Search Results !

पाळधी येथे केळीवर चालला जेसीबी. मालाला योग्य भाव व मागणी नसल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदील!! लाखोचा खर्च गेला वाया...




 दिशा लाईव्ह न्यूज--::-- पहूर प्रतिनिधी-  ता जामनेर - मागील काही वर्षापासून कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी केळी लागवडीचा निर्णय घेतला आणि मागील वर्षी जामनेर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली. 

जामनेर तालुक्यातील सुनसगाव येथील शेतकरी भारत पंढरी फिरके यानी तीन हजार खोड असलेली केळी बाग जेसीबीने  नुकतीच उपटून फेकली आहे. शेतकऱ्याने आतापर्यंत लावलेला खर्च वाया गेला आहे .

 तीन हजार खोड लावून त्यांनी केळी बाग फुलवली खते इतर मोठा खर्च केला. परंतु केळी कापणीवर आल्यावर व्यापारांच्या मागे फिरून हि घेण्यास तयार नव्हते, भारत फिरके यांनी थेट केळी बाग जेसीबी च्या साह्याने उपटून  फेकली आहे.

यावर्षी बदललेले हवामान तसेच सततचा पाऊस व इतर अनेक कारणांमुळे केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊन देखील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास मातीमोल करून टाकला आहे. अतिशय उत्कृष्ट प्रकारची केळी आपल्या डोळ्यात देखत शेतात पिकून खराब होत असताना शेतकऱ्याला पहावे लागत आहे.



 शेतातील माल पक्का झालेला असून व्यापारी खरेदीसाठी प्रतिसाद देत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकरी हवालदिल झालेला आहे. यात व्यापारी हे तांत्रिक तूट निर्माण करून शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

 जामनेर तालुक्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर केळीचे उत्पादन झाले असून शेतात तयार झालेला पक्का माल घेण्यासाठी कोणताही व्यापारी येत नसल्याने व काही ठिकाणी अतिशय कमी भावात मालाची मागणी होत आहे.

 तसेच आलेला माल खराब होत आहे .त्यामुळे हा शेतकरी हवालदील झालेला आहे .

तरी शासनाने याकडे लक्ष देऊन खरोखर मागणीत घट आहे की हे व्यापारी तांत्रिक तूट निर्माण करत आहे, याचा तपास करून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळवून द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

 शेतकऱ्याने अतिशय कष्टाने पिकविलेला माल हा मातीमोल भावात होत असून उत्पादन खर्चही निघत नसल्याने बरेचसे शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत .

कापूस आणि मका या पिकाचे देखील याच प्रकारचे हाल असल्याने शेतकऱ्याने करावे तरी काय ? असा प्रश्न ते विचारीत आहेत.

Post a Comment

0 Comments