तोरणाळे-प्रतिनिधी.--कृष्णा पाटील.
दिशा लाईव्ह न्यूज ---:::----जामनेर तालुक्यातील तोरणाळे येथे राज्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत प्रस्तावित संविधान भवन बांधकामास शासनाने औपचारिक मान्यता दिली असून या निर्णयामागे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा.नामदार गिरीशभाऊ महाजन यांचे विशेष प्रयत्न आहेत.
काल या कामाच्या भूमिपूजनाचा सोहळा दिमाखात संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांच्या उत्साही सहभागाने वातावरण भारावून गेले होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा.जे. के. चव्हाण रावसाहेब, जिल्हा परिषद सदस्य राजु पाटील, माजी सभापती नवलसिंह पाटील, जी.वि. पाटील (अभियंता, जामनेर) यांनी हजेरी लावली. त्यांच्यासोबत गावातील लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
नवीन संविधान भवन हे तोरणाळे परिसरातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजासाठी अत्यावश्यक असलेल्या शैक्षणिक, सामाजिक आणि विकासात्मक उपक्रमांचे केंद्र ठरणार आहे. या भवनामुळे समाजातील वंचित घटकांना स्वतंत्र बैठक व्यवस्था, सामुदायिक कार्यक्रमांचे आयोजन, शासकीय योजना समजून घेण्याचे मार्गदर्शन आणि विविध उपक्रमांसाठी निश्चित अशी पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहे.
भूमिपूजन सोहळ्यात बोलताना मान्यवरांनी या योजनेचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रमाणे सामाजिक विकास हा समाजाच्या प्रगतीचा मुख्य आधार आहे. संविधान भवन उभारणीमुळे तोरणाळे गावाला नवी दिशा मिळेल आणि समाजातील दुर्लक्षित घटकांच्या उन्नतीसाठी ही योजना मैलाचा दगड ठरेल.”
गावातील नागरिकांनीही या प्रकल्पाबद्दल आनंद व्यक्त करत मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. अनेकांनी सांगितले की या भवनामुळे गावात शैक्षणिक उपक्रम, सभागृह सुविधा, तसेच सामाजिक विकासाला चालना मिळेल.
कार्यक्रमाची सांगता बांधकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी उपस्थितांनी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
संपूर्ण गावासाठी विकासाचे नवे दार उघडणारा हा निर्णय अनेकांच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरत असून संविधान भवन तोरणाळेच्या सामाजिक प्रगतीचा नवा आधारस्तंभ ठरणार आहे..





Post a Comment
0 Comments